पुणे : ‘दिवाळीत फराळ खाताना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या सहव्याधी असणाऱ्यांसाठी फराळ हा अनेकदा आरोग्याची मोठी चिंता ठरतो. तेल, तूप, साखर, मैदा आणि मिठाच्या अतिवापरामुळे अशा रुग्णांसमोर आहाराचे मोठे बंधन येते. मात्र, फराळ पूर्णपणे वर्ज्य करण्याची आवश्यकता नसून, पदार्थ बनवण्याच्या पद्धतीत योग्य बदल, घटकांचे नियंत्रित प्रमाण आणि वैयक्तिक पथ्यांची काळजी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सहव्याधीग्रस्तांनाही आरोग्याशी तडजोड न करता दिवाळीच्या फराळाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो,’ असा मोलाचा सल्ला वैद्यकीय आणि आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले, ‘दिवाळीच्या फराळात मीठ, साखर आणि तेल या तीन घटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कोणत्या प्रकारची सहव्याधी आहे, यानुसार फराळात बदल करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. हृदयविकार, कोलेस्टेरॉल, अँजिओप्लास्टी किंवा हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णांनी तेलकट आणि तळलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. मधुमेह असणाऱ्यांनी साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहासह हृदयविकार असणाऱ्यांनी या तिन्ही घटकांबाबत विशेष काळजी घ्यावी.’
तज्ज्ञांनी सांगितले, ‘फराळातील पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करण्याऐवजी त्यांचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत बदलणे अधिक फायद्याचे ठरते. उदाहरणार्थ, चकली किंवा इतर तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले किंवा कमी तेलात तयार केलेले पदार्थ निवडता येतात. पदार्थ तयार करताना तळण्याऐवजी भाजण्याच्या पद्धतीचा वापर करण्यावर भर द्यावा. कोणते तेल वापरावे, यापेक्षा तेलाचे एकूण प्रमाण आणि पदार्थ तयार करण्याची पद्धत याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तेलाचा वापरही कमी प्रमाणात करावा.’
‘पुरेसे पाणी प्या. जेवणानंतर १०–१५ मिनिटे चालण्याची सवय ठेवा. उपाशी राहून फराळ करू नका. कोल्ड ड्रिंक्सऐवजी लिंबूपाणी, ताक किंवा साखर न घातलेले पेय निवडा. फराळासोबत भाजलेले चणे, दही, दूध किंवा मूठभर कडधान्यांचा समावेश करा. दिवसभर हालचाल आणि व्यायाम सुरू ठेवा,’ असेही दामले यांनी सांगितले.
आहारतज्ज्ञ डॉ. अवंती दामले यांनी फराळ आरोग्यदायी व्हावा, यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.
- बेक्ड चकलीला पसंती : चकली तळण्याऐवजी बेक्ड चकलीचा पर्याय निवडा. भाजणीमध्ये नाचणी, ज्वारी आणि बाजरीचा समावेश करा.
- करंजीत गुळाचा वापर : साखरेऐवजी मर्यादित प्रमाणात गूळ वापरा. सारणात सुके खोबरे, बदाम आणि अक्रोड घाला.
- लाडूंचे विविध पर्याय : बेसन, रवा लाडूंबरोबर डिंक, मेथी, तीळ आणि सुक्या मेव्याचे लाडू खा. साखर आणि तुपाचे प्रमाण कमी ठेवा.
- चिवड्यात पौष्टिक घटक : पोह्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, डाळं, कढीपत्ता आणि विविध बियांचा समावेश करा.
- मिठाईचे प्रमाण मर्यादित : श्रीखंड, बासुंदी आणि पेढे यांचे छोटे भाग घ्या.
- फळे आणि सुक्या मेव्याला प्राधान्य : फराळात फळे, खजूर आणि सुका मेवा यांचाही समावेश करा. तज्ज्ञांचा सल्ला काय ?
दिवाळीचा फराळ हा निश्चितच आरोग्यदायी होऊ शकतो. यामध्ये काही फेरबदल करणे आवश्यक आहे. मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यास उच्च रक्तदाब असणाऱ्यांनादेखील फराळाचा आस्वाद घेता येईल. पदार्थ तळून खाण्यापेक्षा जर भाजण्याचा पर्याय मिळत असेल, तर तो स्वीकारावा. तसेच, आपली नियमित औषधे घेऊन व्यायामाचीही जोड द्या. – डॉ. हेमंत कोकणे. हृदयरोगतज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय
दिवाळीचा फराळ घेताना मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घ्यायची आवश्यकता आहे. फराळामध्ये खजूर, मध याचा वापर करता येऊ शकतो. गुळाचाही कमीत कमी वापर केल्यास दिवाळीच्या फराळाचा आस्वाद मधुमेही रुग्णसुद्धा घेऊ शकतात. – डॉ. सचिन पंडित, मधुमेहतज्ज्ञ
