पुणे : राज्यात सरासरी तापमान चाळीस अंशांवर गेल्याने उन्हाच्या झळा आता शेतीपिकांना आणि विशेषकरून फळपिकांना असह्य होऊ लागल्या आहेत. कोकणातील आंबा, काजूसह, नाशिकमध्ये द्राक्ष, खान्देशात केळी आणि महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीला मोठा फटका बसत आहे.

उन्हामुळे आंबा आणि काजू उत्पादनावर वाईट परिणाम झाला असून द्राक्षाचे घड करपत आहेत. द्राक्ष मण्यांना तडे जाण्याच्या घटनाही वाढल्या. खान्देशात केळीच्या बागा करपल्या. नव्याने केलेली लागवड अडचणीत आली. केळीचे लहान आणि काढणीला आलेले घड उन्हामुळे करपून काळे पडत आहेत. त्याचा केळी उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे.

उन्हाळय़ात पेरणी केलेले सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पण त्यांनाही उन्हाचा तडाखा बसला आहे. ढोबळी मिरचीची रोपे करपत आहेत. दोडका, टोमॅटो, वांगी आदी पालेभाज्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. फुले गळून पडणे, फळधारणा न होण्याच्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावू लागल्या आहेत. नव्याने लागवड केलेल्या द्राक्ष वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याची माहिती मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दिनकर गुजले यांनी दिली आहे.

स्ट्रॉबेरीचा हंगाम आधीच संपला..

स्ट्रॉबेरीचा हंगाम २० एप्रिलपर्यंत चालतो. पण, यंदा मार्चअखेरच उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे फळे करपू लागली होती. आता स्ट्रॉबेरीच्या वेली करपून गेल्या आहेत. यंदाचा हंगाम मार्चअखेरच संपला . अपवाद सोडला तर महाबळेश्वर परिसरात कुणाच्याच शेतात स्ट्रॉबेरी शिल्लक नाही, अशी माहिती महाबळेश्वर फळे, फुले उत्पादक संघाचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे यांनी दिली.

तापमान वाढल्यामुळे आंब्यात साका (आंब्यात पांढरा भाग) तयार होण्याचे प्रमाण वाढणार आहे. काढणीला आलेल्या आंब्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्यासह आंबा देठाजवळ काळा पडण्याचा धोका आहेच. काजू बिया तयार झाल्यामुळे उत्पादकांना नुकसानीची फारशी भीती नाही.

धनंजय गोलम, तंत्रज्ञान व्यवस्थापक, वेंगुर्ला कृषी विभाग (आत्मा)