पुणे : जमू-काश्मीरपासून उत्तरेकडील सर्व राज्यांत आणि मध्य भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंत सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. त्यामुळे देशाच्या निम्म्याहून अधिक भारतात उन्हाचा चटका तीव्र झाला आहे.

 राज्यात सध्या मध्य महाराष्ट्रातील काही भागातील पारा वाढला असून, विदर्भात ९ ते ११ एप्रिल या कालावधीत पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दक्षिणेकडील बहुतांश भागांसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मात्र पावसाळी वातावरण आहे.

देशाच्या उत्तरेकडील भागापासून मध्य भारतापर्यंत मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून उष्णतेच्या लाटा कायम आहेत. निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे उन्हाच्या चटक्यात भरच पडत आहे. उत्तर-दक्षिण भागातून उष्ण आणि कोरडे वारे सातत्याने महाराष्ट्राच्या दिशेने वाहन आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानाचा पाराही सातत्याने वाढतो आहे.

राजस्थानमध्ये सध्या उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड ठिकाणेही सध्या तापली असून, तेथे सरासरीपेक्षा अधिक तापमान होऊन उष्णतेच्या लाटेची स्थिती झाली आहे. त्यासह चंडीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यात उष्णतेच्या लाटा आहेत. 

तापभान.. उत्तरेकडील तापमानात पुढील दोन दिवसांत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी पाच ते सहा दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असून, ९ एप्रिलनंतर विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

सलग दहा दिवस..

विदर्भ, मराठवाडय़ात सर्वत्र, तर मध्य महाराष्ट्रात काही भागात दिवसाचे कमाल तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सरासरीपेक्षा अधिक आणि ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची लाहीलाही होत आहे. रात्रीचे किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत वाढल्याने रात्रीचा उकाडा हैराण करतो आहे. विदर्भातील अकोला येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या विभागात सर्वत्र तापमान चाळिशीपार आहे. बुलढाणा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी भागात ४२ अंशांवर तापमान आहे. मराठवाडय़ात परभणीत ४२ अंश, तर इतर ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर आदी भागातील तापमान ४० ते ४१ अंशांवर आहे. मुंबईसह कोकण परिसरात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे आहे.