पुणे : राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट कायम आह़े या भागांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या परिणामामुळे विदर्भात उष्णतेची लाट आणि देशातील उच्चांकी तापमान कायम आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत तापमानात वाढ झाल्याने होरपळ वाढली आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशपासून विदर्भापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भासह या सर्व भागांतील कमाल तापमान ४२ ते ४४ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, तमिळनाडू आदी राज्यांतील तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर आहे. देशातील उष्णतेच्या लाटेच्या सर्व भागांमध्ये आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा आणखी तीन दिवस वाढलेला राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, राजस्थान आणि उत्तर- मध्य प्रदेशमध्ये १२ मेपर्यंत, उत्तर महाराष्ट्रात ९ मेपर्यंत, तर हरियाणा, दिल्ली, पंजाब आदी राज्यांत १२ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. रविवारी (८ मे) विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांतही तापमानाचा पारा ४४ अंशांपुढे होता. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे ४० अंशांपुढे, तर परभणी आणि नांदेड येथे ४१ अंशांपुढे तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात रविवारी तापमानात काही प्रमाणात वाढ झाली. पुणे शहरात हंगामात दुसऱ्यांदा तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतही तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान नोंदविले गेले. मुंबई परिसरासह कोकण विभागात मात्र सर्वत्र तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे.

उष्णतेची लाट

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार १२ मेपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे. प्रामुख्याने अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढलेला राहील. मध्य महाराष्ट्रात आणखी एक दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती असणार आहे. धुळे, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांत उन्हाचा चटका तीव्र असेल.

चक्रीवादळाची स्थिती काय?

बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य भागातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर रविवारी ‘असानी’ या चक्रीवादळात झाले. हे चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. ओदिशातील पुरीपासून १००० किलोमीटर, तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून ते ९४० किलोमीटर अंतरावर आहे. पुढील बारा तासांत ते तीव्र होणार आहे. ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर चक्रीवादळ किनाऱ्याकडे न जाता पूर्वोत्तर भागाकडे वळणार आहे. मात्र, या कालावधीत त्याचा वेग ११५ किलोमीटपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ओदिशा, आंध्र प्रदेशमध्ये १० आणि ११ मे रोजी मुसळधार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस कुठे?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ १०, ११ मे रोजी तीव्र स्वरूप घेणार आहे. या कालावधीत राज्यात काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात १० ते १२ मेदरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्रातही दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागात आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट शक्य आहे.

पारा घसरण्याची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये ‘असानी’ या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी (८ मे) जाहीर केले. हे चक्रीवादळ ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या जवळ असताना महाराष्ट्रात काही भागांत पावसाळी वातावरण तयार होणार असल्याने तापमानाचा पारा काही प्रमाणात खाली येऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे.