लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रापासून केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामानविषयक स्थिती मोसमी पावसासाठी पोषक आहे.

आणखी वाचा-पिंपरी: डॉक्टरच्या चारचाकीची रिक्षा, दुचाकीला धडक; तीन जण करकोळ जखमी, गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसासारखा मेघगर्जना, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मंगळवारसाठी इशारा

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे

पिवळा इशारा – विदर्भ, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार