पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरातील बारा ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. तर, विजेच्या धक्क्याने पाच श्वानांचा मृत्यू झाला. सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

गेल्या चार दिवसांपासून शहरात दररोज दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारीही सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दिवसभर या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी साडेतीननंतर अचानक ढग दाटून आले.

चार वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने कामावरून सुटलेल्या कामगारांची, महिला वर्गाची, तसेच वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिंपरीतील अजमेरा कॉलनी, चिखलीतील मोरे वस्ती, भोसरी एमआयडीसी चौकालगत, इंद्रायणीनगर या भागात पाणी साचले होते.

शहरात बारा ठिकाणी झाडपडीच्या घटना

पावसामुळे शहरात बारा ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पिंपरी, चिखलीत दोन ठिकाणी, शिवतेजनगर येथे गणपती मंदिराजवळ, जगताप डेअरी, आकुर्डीतील खंडोबा माळ, तसेच ऐश्वर्यम् सोसायटीजवळ, तळवडेतील जोतिबानगर, निगडी – यमुनानगर, शाहूनगर, चिंचवड, शाहूनगर या ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले.

विजेच्या धक्क्याने पाच श्वानांचा मृत्यू

पिंपरीतील खराळवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) कामासाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचले होते. पाण्यातील विजेच्या तारेमध्ये विद्युत प्रवाह शिरला होता. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास या ठिकाणी आलेल्या चार श्वानांना तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक बसला. यात चारही श्वानांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली. तर, पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील येथे विद्युत खांबाला चिकटल्याने एका श्वानाचा मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वानांच्या मृत्यूप्रकरणी ‘एमएनजीएल’चे कर्मचारी, संबंधित ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख कुंभार, पोलीस निरीक्षक, संत तुकारामनगर पोलीस ठाणे</p>