Heavy Rain Alert Pune : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी साडेसातपर्यंतच्या आकडेवारीनुसार लवासा येथे तब्बल ४५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

गेले काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः घाट माथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्याबरोबरच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा… पुणेकरांनो, महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नका, पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

हवामान विभागाच्या संशोधन आणि सेवा विभागाचे कृष्णकांत होसाळीकर यांनी आज सकाळी साडेसातपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी दिली.सकाळी साडेआठपर्यंत लवासा येथे ४५३ मिलीमीटर, लोणावळा येथे ३२२ मिलीमीटर, निमगिरी येथे २३२ मिलीमीटर, माळीण येथे १८० मिलीमीटर, चिंचवड येथे १७५ मिलीमीटर, तळेगाव येथे १६७ मिलीमीटर, एनडीए आणि तळेगाव येथे १६७ मिलीमीटर, वडगाव शेरी येथे १६६ मिलीमीटर, वडगाव शेरी येथे १४० मिलीमीटर, पाषाण येथे ११७ मिलीमीटर, शिवाजीनगर ११४ मिलीमीटर, हडपसर येथे १०८ मिलीमीटर, दापोडी येथे १०२ मिलीमीटर, हवेली येथे ८२ मिलीमीटर, मगरुट्टा येथे ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हे ही वाचा… डेक्कन जिमखाना येथील पुलाच्या वाडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

हवामान विभागाने आज (२५ जुलै) जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.