पुणे : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन आलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर गुरुवारी राज्याचा निरोप घेतला. मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यातून मोसमी वारे माघारी गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात यंदा त्यांचा चार महिने नऊ दिवसांचा मुक्काम होता.यंदा राज्यात ५ जूनला प्रवेश केलेल्या मोसमी वाऱ्यांनी पाचच दिवसांत म्हणजे १० जूनला राज्य व्यापले. जून ते सप्टेंबर या मुख्य हंगामाच्या चार महिन्यांमध्ये जून आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पावसाने दीर्घ ओढ दिली. मात्र, सप्टेंबरमध्ये संपूर्ण राज्यात पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे पाणीसाठय़ातही मोठी वाढ झाली.

मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास राजस्थानमधून यंदा १९ दिवस उशिराने सुरू झाला होता.

राज्यभरात उकाडा : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा आकाश निरभ्र राहात असल्याने कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढला आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.