पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पाण्याची चिंता मिटणार, धरणक्षेत्रांत पावसाला जोर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

dam
धरणक्षेत्रांत पावसाला जोर

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या शहरात पाणीकपातीला सोमवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धरणांच्या क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याची बाब समाधानकारक आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये २.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९.४१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६८ टीएमसी म्हणजेच २९.७६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ५.९४ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सकाळी टेमघर धरण परिसरात ३५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात १८ मि.मी. पानशेत धरण परिसरात १९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात चार मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे सात आणि सहा मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दोन मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमध्ये ०.१४ टीएमसी म्हणजेच ०.५० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने पुणे महानगरपालिकेकडून सोमवारपासून पाणीकपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही पाणीकपात ११ जुलैपर्यंत सात दिवस करण्यात आली आहे. या कालावधीत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचे प्रमाण, धरणांमध्ये जमा होणारा पाणीसाठा, हवामान विभागाचे अंदाज यांचा विचार करून पुढील आठवड्यात पाणीकपात सुरूच ठेवायची किंवा कसे?, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या धरणांमध्ये संततधार पाऊस पडत असून पुढील पाच दिवसांत मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर             ०.०१            ०.३३

वरसगाव १.०४            ८.१४

पानशेत १.११            १०.४३

खडकवासला ०.५८            २९.१५

एकूण             २.७४            ९.४१

शहरात जोरदार सरींची हजेरी

पुणे शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी जोरदार सरीनी हजेरी लावली. शहरात दिवसभर पावसाळी वातावरण होते. त्यामुळे तापमानात झपाट्याने घट झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ७ आणि ८ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या दोन दिवसांत शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकूणच शहर आणि परिसरात तसेच घाट विभागात आठवडाभर पावसाची शक्यता आहे.

पुण्याच्या चार धरण क्षेत्रात पाऊस
पुणे: सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६६ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ५३ मि.मी, पानशेत धरण परिसरात ५०मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १९ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २.९६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १०.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवार रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी ०.२२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rainfall dam area forecast next five days pune print news ysh

Next Story
भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेत ; यंदा पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी