पुणे : जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच जुलै महिना उजाडला तरी, अद्यापही जिल्ह्यातील ९६ हजार नागरिकांना ५१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्या नऊ तालुक्यांमधील ४३ गावांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जून महिन्यात मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. परिणामी पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. धरणांनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील तब्बल साठपेक्षा जास्त गावे तहानलेली होती. या गावांना शासकीय आणि खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे यंदा उन्हाळा संपतानाच पाणीटंचाई जाणवू लागली होती. मोसमी पाऊस वेळेत दाखल होऊनही जून महिन्यात दमदार पाऊस झाला नव्हता. मात्र, सध्या गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. तरीदेखील अद्याप ९६ हजार ६७९ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?
Water scarcity in Jalgaon district
निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचे संकट; ३१ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी

आंबेगाव, बारामती, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा अशा नऊ तालुक्यांमधील ४३ गावे, २७३ वाड्यांना खासगी ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून सर्व तहानलेल्या गावांना खासगी टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये अनुक्रमे १५ हजार ४८ आणि २८ हजार ७५८ बाधित लोकसंख्या असून संबंधितांना प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांत १४ आणि नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बारामती, भोर, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू असून हवेली तालुक्यात पाच टँकर सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील वाड्यांवर पहिला टँकर सुरू करण्यात आला. त्यानंतर कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती. सध्या पाऊस पडत असूनही धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नसल्याने अद्यापही बाधित नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई

सर्वाधिक पाण्याची टंचाई आंबेगाव तालुक्याला बसत असून या ठिकाणी ११ गावांमधील २२ हजार १९५ बाधितांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी १२ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात सहा गावांमधील १९ हजार ५०० हजारांहून अधिक बाधितांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी दहा विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.