विभागीय आयुक्तालयाकडून निधी उपलब्ध
पुणे : गेल्या वर्षी जुलैअखेरीला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाने तब्बल आठ महिन्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. विभागीय आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये मावळ आणि मुळशी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. जिल्ह्यात घरांचे नुकसान, घरगुती वस्तू, मृत जनावरे, पूर्णत: किंवा अंशत: पडझड झालेली घरे, शेतजमिनीचे नुकसान, कुक्कुटपालन शेड आणि शेतीपीक किंवा फळपिकांचे नुकसान याकरिता नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईपोटी तीन कोटी ४३ लाख ५० हजार ७५८ रुपयांच्या निधीबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. सात तालुक्यांमधील ३८१ गावातील २३ हजार ३१ शेतकऱ्यांच्या शेती आणि फळपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सर्वाधिक मावळ तालुक्यात १५८ गावांतील ६४६० शेतकरी आणि मुळशीतील ६१६६ शेतकरी बाधित झाले होते. लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. लाभार्थी निश्चित झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गरजेनुसार कोषागारातून रक्कम प्राप्त होणार असून त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.