पुणे : शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा ‘महावितरण’च्या वीज यंत्रणेला बसल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडे पडल्याने आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. तसेच, वीजखांबांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे तारा तुटल्या. महर्षीनगर, मार्केट यार्ड, प्रेमनगरचा काही भाग, मुंढवा, बंडगार्डन, फुरसुंगी, कोथरूड, शिवणे, धानोरी, धायरी फाटा आदी भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. याच कारणांमुळे भोसरी गाव, तळवडे, देहूगाव, शेलारवस्ती, चिखली, चऱ्होली, दिघी, भोसरी, यमुनानगर, विठ्ठलवाडी, रुपीनगर, आळंदी रोड, इंद्रायणीनगर, चिंचवड स्टेशन, संतनगर, आदर्शनगर, खडी मशिन, शांतिनगर या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. या भागांत दुरुस्ती कामे करून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये चाकण आणि परिसरात मुसळधार पावसामुळे महावितरणचे उच्च व लघुदाबाचे १० वीजखांब कोसळले. त्यामुळे चाकण, कुरुळी, निघोजे, सारा सिटी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

कोंढव्यात ३८ हजार नागरिक अंधारात

कोंढवा परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कोंढवा परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे ३८ फीडर पिलरमध्ये पाणी शिरले. खबरदारी म्हणून कोंढवा, जेके पार्क व कुमारपाम या तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोंढवा परिसरातील सुमारे ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पाऊस कमी झाल्यानंतर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे सुरू केली. पाणी शिरलेल्या फीडर पिलरमधील पाणी काढून कोरडे करण्याचे काम करण्यात आले. पहाटे सहा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भर पावसात, रात्री-अपरात्री खंडित विजेचा बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरुस्तीचे काम करणारे अभियंते व जनमित्रांसाठी पावसाळी दिवस आव्हानात्मक असतात. सर्व जण हे आव्हान पेलून दुरुस्तीचे काम करतात.- निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण