पुणे : खडकवासलातून पाण्याचा विसर्ग वाढला, भिडे पूल पाण्याखाली ; सतर्कतेचा इशारा

नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने बाबा भिडे पुल पाण्याखाली

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत खडकवासलातून २२ हजार ८८० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, पण आता 27 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळशी धरणातूनही 10 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. परिणामी, नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण देखील 100% भरले आहे. मावळातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही पूल पाण्याखाली गेल्याने येथील काही गावांचा जनसंपर्क तुटल्याची माहिती आहे. तर, लोणावळ्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रभरात 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवनाधरण क्षेत्रात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणाच्या परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून सकाळी 7 वाजता 10 हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडण्यात येत होते. सकाळी 8 वाजता त्यात वाढ करुन 15 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  या तीनही धरणातून सोडण्यात येणारे पाणी तसेच धरणापुढील भागात पडत असलेला पाऊस यामुळे संगम पुलाजवळ मुळा मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rains in pune khadakwasla dam release 27000 cusecs water sas

ताज्या बातम्या