पुण्यात संततधार पावसाचा मुक्काम!

चोवीस तासांत पुण्यात ९८.२ मिमी पाऊस झाला असून धरणक्षेत्रातही जोराचा पाऊस झाला आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारीही संततधार पाऊस झाला. पवना नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. छायाचित्र- राजेश स्टीफन

चोवीस तासांत ९८.२ मिमी. पाऊस
पुण्यात शनिवारपासून पावसाची सुरू झालेली संततधार रविवारीही कायम राहिली. शनिवारी संध्याकाळपासून पुढे चोवीस तासांत पुण्यात ९८.२ मिमी पाऊस झाला असून धरणक्षेत्रातही जोराचा पाऊस झाला आहे. पहिल्याच सलग पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर जुन्या झाडांच्या मोठय़ा फांद्या पडल्या, तर काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ठिकठिकाणचा वीजपुरवठाही पावसामुळे पुन:पुन्हा खंडित होत होता.
गेले काही दिवस पुण्याला पावसाने हुलकावणी दिली होती. दररोज ढग दाटून येत होते, परंतु नोंद होण्याजोगा पाऊस पडत नव्हता. ही प्रतीक्षा शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने संपवली आणि हा पाऊस रविवारीही सलग पडत राहिला. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) नोंदींनुसार शनिवारी दिवसभरात पुण्यात १.३ मिमी पाऊस झाला होता. संध्याकाळी साडेपाच नंतर पावसाचा जोर वाढला आणि तो रात्रीही कायम राहिला. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून रविवारी सकाळी साडेआठ पर्यंत ७२.२ मिमी. पाऊस पडला होता. रविवारी संध्याकाळपर्यंत पुन्हा २९.८ मिमी. पाऊस झाला. ‘सिटिझन सायन्स नेटवर्क’ या वेधशाळेच्या माहितीनुसार शनिवारपासूनच्या चोवीस तासांत सिंहगड रस्ता, वारजे, कोथरुड आणि नवी पेठ येथे इतर भागांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती, तर पावसाच्या प्रमाणात हडपसर, चिंचवड आणि हिंजवडीचा त्यानंतर क्रमांक लागतो. रविवारी वारजे व चिंचवडमध्ये तुलनेने अधिक पावसाची नोंद झाली.
पहिल्यांदाच सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. बऱ्याच ठिकाणी मोठय़ा पावसामुळे झाडांच्या मोठय़ा फांद्या मोडून पडल्या. खोलगट भागांमध्ये असलेल्या घरांमध्ये आणि वस्त्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित होत होता. पुण्याच्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या नोंदीनुसार पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमध्ये एकूण २.९६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला. पिंपरी-चिंचवडमध्येही चांगला पाऊस सुरू असून या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात एकूण १.५१ टीएमसी पाणीसाठय़ाची नोंद झाली.

आज मुसळधार पाऊस
पुणे आणि परिसरासाठी ‘आयएमडी’ने शनिवापर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी अधूनमधून मुसळधार पाऊस पडू शकेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. बुधवापर्यंत थांबून-थांबून पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढणार असून शनिवापर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

आंबेगाव खोऱ्यासह माळशेज, कशेडी घाटातही दरडी कोसळण्याचा अंदाज
आंबेगाव खोऱ्यातील माळीणच्या आसपासच्या पांचाळे व असाणे गावांसह माळशेज व कशेडी घाटात काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचा इशारा ‘सतर्क’ या खासगी संस्थेने दिला आहे. मुंबईत विरार आणि भांडुपच्या टेकडय़ांच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही इशारा देण्यात आला आहे. मुंबई- पुणे, रायगड-सातारा आणि रत्नागिरी- कोल्हापूर या तीन विभागांसाठी ‘सतर्क’ यंत्रणेने चोवीस तासांसाठी काही भागांत दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये गेल्या ७२ तासांत होऊन गेलेला पाऊस जमेस धरुन हा अंदाज देण्यात आला आहे. कुंभार्ली घाट, अंबानळी घाट, महाबळेश्वर, पोलादपूर रस्ता येथेही काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत विरार व भांडुपच्या टेकडय़ांच्या पायथ्याशी असलेली गावे, कल्याणमधील टेकडय़ांच्या पायथ्याची गावे, आंबेगाव खोऱ्यातील माळीणच्या आसपासची पांचाळे, असाणे ही गावे, माळशेज घाट, मुंबई-गोवा महामार्गाजवळील कशेडी, सुकेळी हे भाग आणि महाडच्या आसपासच्या डोंगरांच्या पायथ्याची डाफगाव, जुई, रोहन ही गावे, दापोलीच्या आसपास हर्णे रोड, दाभोळ ही गावे, गोवळकोट परिसर या ठिकाणीही दरडींच्या दृष्टीने इशारा देण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rains lash pune

ताज्या बातम्या