पुणे : मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत उर्वरित राज्यामध्ये तुरळक भागातच हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी जुलै महिन्यातील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडणार आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील पाऊस सर्वसाधारण राहण्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत २८, तर सांताक्रुझ केंद्रावर ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अलिबागला ८७, तर डहाणूमध्ये ६४ मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर आणि विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये चार दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या उर्वरित भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पर्जन्यभान..

गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबई विभाग आणि कोकणात जोरदार पाऊस झाला. कुलाबा केंद्रावर चोवीस तासांत २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महालक्ष्मी विभाग १८०, तर गुहागर, मालवण आणि राजापूरमध्ये १४० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. अलिबाग, रत्नागिरी, मुरूड, उरण, वसई आदी भागांत १०० मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वरमध्ये ५० ते ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कारण काय?

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणच्या किनारपट्टीच्या भागात गुजरातपासून कर्नाटकपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले असल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातून भूभागाकडे बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाला सुरुवात झाली आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा..

कोकण विभागात पुढील चार ते पाच दिवस पाऊस कायम राहणार आहे. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४ आणि ५ जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या महिन्यात काय?

जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असल्याने अनेक भागांत पाण्याबाबत चिंता आहे. सध्या मुंबईसह कोकण विभागात पाऊस होत असला, तरी उर्वरित भागांत पाऊस कमी आहे. त्यामुळे जुलैमधील पावसाकडे डोळे लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी जुलैमधील देशातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार या महिन्यात कोकण विभागात सर्वसाधारण पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पाऊस सरासरी गाठणार आहे. मात्र, विदर्भात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि बदलापूर शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी  शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ठाणे शहरात काही भागात वृक्ष उन्मळून पडले. तर एका इमारतीचा सज्जा कोसळण्याबरोबरच संरक्षक िभत पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. 

जोरदार पावसामुळे ठाणे शहरातील तलावपाली, वदंना सिनेमागृह, तीन पेट्रोल पंप, घंटाळी रोडसह मुंब्रा तसेच दिव्यातील काही भागात पाणी साचले होते. पाचपाखाडी येथील भक्ती मंदिर, लुईसवाडी, ब्रम्हांड येथील स्वस्तिक पार्क, कासारवडवली गाव, मनोरुग्णालय परिसर अशा अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पाचपाखाडी, कामगार रुग्णालय परिसरात तीन वृक्ष उन्मळून पडले.  भिवंडी, कल्याण-बदलापूर भागातील मुख्य मार्गावर पाणी साचले होते. काल्हेर-कशेळी मार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत भाग, कल्याण- बदलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains mumbai konkan sections weather department ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST