सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हद्दीतून (सीएमई) बोपखेल गावाकडे जाणारा रस्ता नागरी वाहतुकीसाठी सुरू करावा, या मागणीसाठी बोपखेल ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चाला गुरुवारी हिंसक वळण लागले. मोर्चा रोखण्यासाठी आलेल्या पोलीसांवर ग्रामस्थानी तुफान दगडफेक केली. त्यानंतर पोलीसांनीही गावकऱयांवर जोरदार लाठीमार केला. यामध्ये महिला, मुले, पोलीसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता गावकऱय़ांच्या वापरासाठी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावकऱयांमध्ये संतापाची भावना होती. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या वापरावरून गावकरी आणि लष्करी अधिकारी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावातील श्रीरंग दोधाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा रस्ता ग्रामस्थांसाठी कायमस्वरुपी खुला करण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर सीएमईच्या अधिकाऱयांनी हा रस्ता नागरी वाहतुकीसाठी बंद केला. भाजपचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी दोन दिवसांपूर्वीच हा विषय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यापर्यंत पोचविला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणताही आदेश निघण्यापूर्वीच ग्रामस्थांनी गुरुवारी रस्ताबंदीविरोधात मोर्चाचे आयोजन केले. पोलीसांनी मोर्चा रोखल्यानंतर चिडलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी अंदाधुंद दगडफेक केली. पोलीसांच्या एका बसची गावकऱयांनी तोडफोड केली. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी गावकऱयांवर लाठीमार केला. यामध्ये महिला व मुलांसह अनेक गावकऱयांवर लाठीमार करण्यात आला. पोलीसांनी घटनास्थळी अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडल्या. लाठीमारामध्येही अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेचे वृत्त कळताच पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावकरी आणि प्रशासनमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

bopkhel-2bopkhel-1