पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत होत असलेल्या विविध शैक्षणिक सुधारणा, बदलांबाबत जनजागृती करण्यासाठी आता विद्यार्थी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्या ‘सारथी’ योजनेअंतर्गत देशभरातील २६२ उच्च शिक्षण संस्थांतील ७२१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सारथी अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थी स्वयंसेवकांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या विद्यार्थ्यांनाच धोरणाशी जोडून घेण्यासाठी यूजीसीकडून ‘सारथी’ (स्टुडंट ॲम्बेसिडर फॉर ॲकॅडमिक रिफॉर्म्स इन ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन इंडिया) ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर धोरणाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून उत्तम संवादकौशल्ये, व्यवस्थापन, सर्जनशील असे गुण असलेल्या विद्यार्थ्यांची नावे सुचवण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांची नावे सुचवण्यात आली. हेही वाचा - तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द यूजीसीने जाहीर केलेल्या यादीमध्ये २६२ उच्च शिक्षण संस्थांतील ७२१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्येक संस्थेतील दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना सारथी म्हणून निवडण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या तरतुदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेतले जाणार आहे. हेही वाचा - प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे आधी पर्यटक मुलींचं अपहरण, मग सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून मोठी कारवाई राज्यातील शिक्षण संस्थांचाही समावेश सारथी योजनेत राज्यातील शिक्षण संस्थांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. त्यात पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह अभियांत्रिकी, विधी, औषधनिर्माणशास्त्र, फिजिओथेरेपी, आरोग्यशास्त्र, व्यवस्थापन, नर्सिंग, समाजकार्य अशा विद्याशाखांच्या जवळपास ४५ उच्च शिक्षण संस्थांतील प्रत्येकी दोन किंवा तीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.