पुणे : दुपारची वेळ…पोलंड देशाचा एक नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला… मोबाइल सिम कार्ड हवे असून, स्थानिक दुकानदार परदेशी असल्याने देत नसल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी संबंधित व्यक्तीची सर्व माहिती, कागदपत्रे तपासून खात्री केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी सोबत देऊन या व्यक्तीला सिम कार्ड देऊ केले आणि या नागरिकाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य पोलंडमधील वूत्श या शहरातील रोमन रोझिन्स्की हे योगप्रेमापोटी भारतात आले आहेत. योगविषयक अभ्यासक्रमासाठी पुण्यातील रममानी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट येथे दाखल झाले आहेत. रोमन यांना दूरध्वनी करण्यासाठी रोमिंग पडत असल्याने त्यांनी पुण्यातून सिम कार्ड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शहरातील विविध दुकानांमध्ये सिम कार्ड घेण्यासाठी गेले. मात्र, त्यांच्याकडील पोलंडची कागदपत्रे पाहून सिम कार्ड देण्यास दुकानदारांनी नकार दिला. एका दुकानदाराने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यास काही मदत मिळू शकेल, असे सांगितले. त्यानुसार रोमन हे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

हेही वाचा >>> पुणे: सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

पालखी वारी संदर्भातील बैठक सुरू असतानाही रोमन यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी रोमन यांची भेट घेऊन सर्व समस्या जाणून घेतली. रोमन यांचे पारपत्र, इतर कागदपत्रे तपासून खात्री केल्यानंतर अय्यंगार इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला. सर्व खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी रोमन यांच्यासोबत देऊन त्यांना सिम कार्ड मिळवून देण्यात आले, अशी माहिती गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी दिली.

हेही वाचा >>> तीन दिवस उष्णतेच्या लाटा; विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तापमानवाढीचा हवामान विभागाचा अंदाज

‘पोलंडमध्ये योगविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. माझ्या योगशिक्षकांनी मला पुण्यातील अय्यंगार इन्स्टिट्यूटबाबत माहिती दिली. त्यानुसार दोन महिन्यांसाठी मी पुण्यात दाखल झालो आहे. रोमिंग पडत असल्याने स्थानिक सिम कार्ड घेण्यासाठी विविध ठिकाणी गेलो. मात्र, नकार मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अतिशय आपुलकीने चौकशी करून मला मदत केली आणि मला सिम कार्ड मिळाले,’ असे रोमन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

पोलंडमधील एक नागरिक योगविषयक अभ्यासक्रमासाठी पुण्यात आला आहे. सिम कार्ड खरेदी करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यांची गरज लक्षात घेऊन सर्व कागदपत्रे, पारपत्र याबाबत खात्री केल्यानंतर त्यांना योग्य ती मदत देऊन सिम कार्ड मिळवून देण्यात आले. – ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help of the district collector the foreign citizen got such relief pune print news psg 17 ysh
First published on: 02-06-2023 at 10:02 IST