गडचिरोली जिल्ह्य़ात भामरागड तालुक्यात असलेल्या हेमलकसा प्रकल्पात राहणाऱ्या साडेसहाशे आदिवासी मुलांसह तेथील रुग्णालयाला रोज पाच लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. प्रकल्पापासून जवळच नदी असूनही केवळ आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पापर्यंत पाणी आणता येत नव्हते. ही गरज पुण्यातील एका कंपनीने जाणली आणि कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पातून तब्बल तीन कोटींची जलयोजना हेमलकसा येथे साकारली. या योजनेमुळे लोकबिरादरी प्रकल्पाला भेडसावत असलेला पाणीप्रश्न सुटला आहे.

पुण्यातील ‘अ‍ॅटलास कॉप्को’च्या ‘वॉटर फॉर ऑल’ या जागतिक योजनेअंतर्गत उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) या योजनेतून लोकबिरादरी प्रकल्पात हे जलकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. हेमलकसा येथून नदी तीन किलोमीटर लांब आहे. या योजनेअंतर्गत नदीचे पाणी प्रकल्पावर आणले जाते. तेथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. त्या अंतर्गत जलशुद्धीकरण, पाण्याची साठवणूक आणि वितरण अशी यंत्रणा विकसित करण्यात आल्याची माहिती पुण्यातील लोकबिरादरी मित्रमंडळचे कार्यकर्ते प्रशांत कुलकर्णी यांनी दिली.

प्रकल्पाला असलेली पाण्याची आवश्यकता कंपनीच्या लक्षात आणून दिल्यानंतर कंपनीच्या शालिनी शर्मा यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या कामाबद्दल आस्था दाखवली, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. प्रकल्पासाठी लागणारे पाणी नदीतून प्रकल्पापर्यंत आणून त्या पाण्याचे शुद्धीकरण, साठवण व वितरण अशी यंत्रणा उभारणे आवश्यक होते. त्यासंबंधीचे सादरीकरण कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे केल्यानंतर त्यांनी या योजनेला आवश्यक ते सर्व साहाय्य केल्याचे कुलकर्णी म्हणाले.

लोकबिरादरी प्रकल्पात साडेसहाशे आदिवासी मुले आहेत. या सर्व मुलांचा निवास तेथील वसतिगृहात असतो. या शिवाय तेथे पन्नास रुग्णांसाठी रुग्णालय आहे. या प्रकल्पातील कर्मचारी, कार्यकर्ते आणि प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणारे पाहुणे या सर्वासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. हे लक्षात घेऊन जलयोजना राबवण्यात आली. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाणीपुरवठा योजनेमुळे प्रकल्पातील सर्वासाठी शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.

या योजनेचे उद्घाटन ‘अ‍ॅटलास कॉप्को’च्या मनुष्यबळ विकास खात्याचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कंपनीच्या मुख्य संपर्क अधिकारी शालिनी शर्मा, सीएसआर अधिकारी कुलदीप पुरंदरे तसेच मुकुंद सखदेव, योगेश तुळजापूरकर तसेच कल्पना भोळे, देवेंद्र यावलकर, समन्वयक जितेंद्र नायक, लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचे कार्यकर्ते प्रशांत कुलकर्णी, श्रद्धा गंगातीरकर, संतोष कांड, मीना किंकर, अमित दीक्षित, गणेश आवटे, नचिकेत बापट आदींची कार्यक्रमात उपस्थिती होती. ‘अ‍ॅटलास कॉप्को’ने समाजाप्रती असलेली जी बांधिलकी दाखवली त्यामुळे योजना पूर्णत्वास गेली, असे मनोगत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले.