पुणे : शहरातील वाहतूक कोंडीवर दूरगामी उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा दुहेरी भुयारीमार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यास (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट- डीपीआर) विलंब होत असल्यामुळे कसबा विधनसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली.

शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पेठांमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने सध्या अस्तित्वात असणारे रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे दुहेरी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार रासने यांनी लक्षवेधीद्वारे विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर येत्या पंधरा दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

रासने म्हणाले, ‘सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला हा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. या दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रकल्प आराखडा तयार करण्यास विलंब होत आहे.’

दरम्यान, ‘यशदामध्ये शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने आपल्याकडे ही यंत्रणा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तयार करण्याचे पत्र दिले होते. दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार आहेत,’ असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव मंडळांवर खटले मागे घेण्याची मागणी

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळाकडून ध्वनिक्षेपकांची मर्यादा ओलांडण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र, काही मोजक्या मंडळाकडून उल्लंघन झाले असताना अडीचशे ते तीनशे मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. काही लोकांच्या चुकीची शिक्षा सर्वांना होणे अन्यायकारक आहे. सरकारने कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करत गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही हेमंत रासने यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात केली.