पुणे : वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुष्पगुच्छ न आणता ई-कचरा आणावा, असे आवाहन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केले आहे. रासने यांचा सोमवारी (१३ एप्रिलला) वाढदिवस असतो. यंदाचा वाढदिवस मतदारसंघातील नागरिकांकडून ‘ई-कचरा’ गोळा करुन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प रासने यांनी केला आहे.

पुणे शहरासह जगभरात ई-कचरा ही वेगाने वाढणारी आणि गंभीर होत चाललेली समस्या आहे. शहरात दरवर्षी अंदाजे २० ते २६ हजार टनांपेक्षा जास्त ई-कचरा तयार होतो. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी वाढदिवसाला फुले तसेच भेटवस्तू नको, तर शुभेच्छा देण्यासाठी ई-कचरा भेट देण्याचे आवाहन केले आहे. १३ एप्रिलला शनिपार जवळील कवठी अड्डा या आरोग्य कोठीवर या वस्तुंचे संकलन केले जाणार आहे. दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा ई-कचरा गोळा केले जाणार आहे.

मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर्स, बॅटऱ्या यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या कचऱ्यामध्ये शिसे, पारा, कॅडमियमसारखे घातक रसायने असतात. हे घटक माती, पाणी आणि हवेमध्ये मिसळून दीर्घकालीन प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे ई-कचऱ्याचे वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने पुनर्वापर व विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे.

अधिक माहिती देताना आमदार रासने म्हणाले, ई-कचरा ही केवळ शहराची नाही तर जागतिक पातळीवरील गंभीर समस्या बनली आहे. आपण दररोज वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. वाढदिवसान्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न देता ई-कचरा देऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, ही अपेक्षा आहे. छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो, असेही ते म्हणाले.

रासने यांच्या फ्लेक्समुक्त कसब्याला मोठा प्रतिसाद

आमदार रासने यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियान राबवले जात आहे. इंदोर शहरासारखे स्वच्छ पुणे शहर करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यापूर्वी आमदार रासने यांनी ‘फ्लेक्समुक्त कसबा’ हे अभियान सुरु केले होते. या मोहीमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बेकायदा फ्लेक्स मतदारसंघात लावले जात नाहीत. तसेच कचऱ्याचे उकिरडे देखील बंद झाले आहेत. स्वच्छ कसबा मोहिमेअंतर्गत वाढदिवसानिमित्त जमा होणाऱ्या ई-कचऱ्याची पुणे महापालिकेच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यापुढे देखील ई-कचरा संकलन व त्यावर योग्य प्रक्रिया करण्याचा उपक्रम मतदारसंघात कायमस्वरूपी राबवला जाणार आहे.