पुणे: अमरावती जिल्ह्यात नायब तहसीलदारपदी कार्यरत हेमकृष्ण पिसदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२५च्या निकालात यश मिळवले. त्यांनी गुणवत्तायादीत ८४९वा क्रमांक मिळवला असून, शासकीय सेवेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सहाव्या प्रयत्नात त्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, २०२३मध्ये केवळ आठ मार्कांनी त्यांची निवड हुकली होती.

गोंदिया जिल्ह्यातील चिचेवाडा या आदिवासी गावाच्या, शेतकरी कुटुंबातील हेमकृष्णचे आई-वडील शेतकरी आहेत. त्यांची चार एकरांत कोरडवाहू शेती आहे. मोठा भाऊ सध्या निमशासकीय सेवेत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेल्या हेमकृष्ण यांना शाळेत असतानाच यूपीएससीची माहिती मिळाली होती. त्यामुळे बारावीनंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला. अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.

२०२०मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीचा प्रयत्न केला. त्या वेळी करोना महासाथीचा प्रादुर्भाव होता. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. यूपीएससीबरोबरच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचीही तयारी केली. एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात कामगार अधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतरही त्यांचे यूपीएससीसाठी प्रयत्न सुरू होते. २०२३मध्ये यूपीएससीमध्ये त्यांची मुलाखत झाली, पण आठ गुणांनी निवड हुकली. त्या दरम्यान एमपीएससीतून त्यांची तहसीलदार पदावर निवड झाली. आता त्यांनी यूपीएससीमध्ये ८४९वा क्रमांक प्राप्त केला आहे. पदवीनंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे.

हेमकृष्ण म्हणाले, ‘सहाव्या प्रयत्नात मिळालेल्या यशाचा आनंद नक्कीच आहे. सध्या तहसीलदार पदाचे प्रशिक्षण सुरू आहे. काम करत, वेळ काढून अभ्यास करत परीक्षा दिली होती. यूपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी संयम फार महत्त्वाचा आहे. माझे अगदी सुरुवातीचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. अगदी थोड्या गुणांनी एकदा संधी हुकली होती. २०२३पासून अधिक प्रयत्नपूर्वक परीक्षा दिली. सुरुवातीला खासगी शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे शिकवणीवर्ग सोडून स्वत:च अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता.

आता यूपीएससीच्या निकालानंतर कोणते पद मिळू शकते याचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेणार आहे. लोकसेवेसाठी तहसीलदार हे पद महत्त्वाचे असल्याचे काम करताना लक्षात आले आहे. त्यामुळे आता व्यवस्थित विचार करून निर्णय घेणार आहे. तसेच आणखी एक प्रयत्न करून पाहण्याचा विचार आहे.