पुणे : ‘स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिण्याबरोबरच शेतकरी संघटनासाठी केलेले कार्य, धर्माची चिकित्सा करून सत्यशोधक विचारांतून पर्यायी धर्माची मांडणी करणारे महात्मा फुले यांचे विचार आजच्या संदर्भातही औचित्यपूर्ण असेच आहेत. मात्र, त्यांचे दैवतीकरण करून भोंदू बाबाच्या नादी लागत फुलेंच्या विचारांचा केलेला पराभव हेच आमचे मोठे अपयश आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सोमवारी वास्तवावर बोट ठेवले. ही टीका सकारात्मक घेऊन आपल्यात बदल केला पाहिजे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वक्तृत्तोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘आजच्या प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचे औचित्य’ या विषयावर हेरंब कुलकर्णी यांनी स. गो. बर्वे स्मृती व्याख्यान पुष्प गुंफले. त्यावेली ते बोलत होते. कुलकर्णी म्हणाले, ‘बहुजन समाजातील मुले आणि स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी हंटर कमिशनला केवळ निवेदन देऊन फुले थांबले नाहीत. तर त्यांनी १८ शाळा स्थापन केल्या. रात्रशाळा, प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केला. शिक्षण सक्तीचा कायदा करून १७ वर्षे झाली. अजूनही सगळी मुले शाळेत जात नाहीत.
१४ ते १८ वयोगटातील तीन कोटी मुले शाळेबाहेर आहेत, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या इतकी असेल तर कल्याणकारी राज्य कसे म्हणता येईल? आज बहुजन शिक्षणसम्राट झाले आहेत. उच्चवर्णीयांची मुले ‘आयआयटी’मध्ये तर, बहुजनांची मुले ‘आयटीआय’ हा नवा चातुर्वर्ण्य अस्तित्वात आला आहे. इतक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार नसू तर हे ढोंग आहे, असेच म्हणावे लागेल.
‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिणाऱ्या जोतीरावांनी जुन्नर-ओतूर भागात शेतकऱ्यांचे संघटन केले. त्यांच्याच महाराष्ट्रात शेतीमध्ये चार लाख आत्महत्या झाल्या आहेत. समाज म्हणून आपली काय संवेदना आहे?, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला. विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांचे दुःख महात्मा फुले यांनी समजून घेतले. देशात ७५ लाख एकल महिला आहेत. तर, १५ कोटींच्या राज्याच्या लोकसंख्येत एकल महिला आणि त्यांची मुले ही संख्या सव्वादोन कोटी आहे. कोणत्या राज्यात आपण राहतो? वंचितांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये पडते कुठे? नाटक, चित्रपट, समाज माध्यमातून गरिबी गायब झाली आहे. सगळीकडे चकचकीत दिसते. त्यालाच भुलून आपण बळी पडत आहोत, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
सावित्रीच्या लेकी आता पोथी सुंदर वाचतात. आम्हीच फुलेंचा पराभव केला आहे. ४८ टक्के महिला शिक्षिका आहेत. पण, त्यांचे गरिबांशी नाते आहे का? धार्मिक कर्मकांडाचा बहुजन समाज बळी पडला आहे. भोंदू बाबाकडे जाणारे सगळे बहुजन समाजाचे आहेत.-हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
