छत्तीसगड, ओरिसा आदी नक्षलग्रस्त भागातील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी िपपरी-चिंचवड शहरात काही काळ व्यतित केला. तिथे नक्षलवाद्यांची भीती वाटते. मात्र, इथे सुरक्षिततेची खात्री वाटल्याने आनंद अनुभवता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने व सीआरपीएफच्या सहकार्याने आदिवासी आदान-प्रदान या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांची ही भेट घडवून आणण्यात आली. िपपरी पालिकेचे सायन्स पार्क, ऑटो क्लस्टरला भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. एचए कंपनीच्या मैदानावरील पवनाथडी जत्रेतही ते सहभागी झाले. तेव्हा पत्रकारांशी बोलताना विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तेथे नक्षलवाद्यांची भीती वाटते. मात्र, येथे सुरक्षित वाटते. प्रत्येक ठिकाणी कोणीतरी सोबत असल्याने एकटे आहोत, असे वाटत नाही, असे ते म्हणाले.
नक्षलग्रस्त भागातील या विद्यार्थ्यांचे नेतृत्व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, वैशाली रणधीर, हितेंद्र वैद्य यांनी केले, तर विद्यार्थ्यांचे गटप्रमुख म्हणून आर. विजय कुमार, रंजना शर्मा, नागेंद्रकुमार सिंग, एस. के. तिवारी, रिता पोरजा, जिना अहमद, एम शिवाप्पा, एस. के. चव्हाण यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या समवेत तळेगाव येथील केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही उपस्थित होते. या संदर्भात, चंद्रपूर केंद्राच्या समन्वयक जमुना डगावकर यांनी सांगितले की, नक्षली भागातील विद्यार्थ्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने अशी मोहीम राबवण्यात येते. आठ ठिकाणी असा आदान-प्रदान कार्यक्रम झाला असून महाराष्ट्रात प्रथमच आलो आहोत. विद्यार्थी येथील संस्कृती, उपक्रम पाहतात, अद्ययावत ज्ञान मिळवतात आणि आपण कुठे आहोत, याचे आत्मपरीक्षणही करतात. नकारात्मक विचार त्यांच्यात येऊ नये, सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी, असा यामागे प्रयत्न असतो.