उच्चशिक्षित तरुणीकडून १६ तरुणांना लाखोंचा गंडा; डेटिंग अ‍ॅपद्वारे भेटायला बोलवून लुटले

पोलिसांनी ठोकल्या बेड्या; २९ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त

कुछ तुफानी करते है.. हा विचार डोक्यात ठेवून एका उच्चशिक्षित तरुणीने बंबल आणि टिंडर डेटिंग साईटवरून तरुणांसोबत चॅटिंग करून त्यांची आर्थिक लुट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीकडून १५ लाख २५ हजारांचे २९ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त करण्यात आले असून, सायली असं नाव असलेल्या या २७ वर्षीय तरुणीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट चारला यश आले आहे.

ही तरूणी चॅटिंगच्या माध्यमातून तरूणांना हॉटेलमध्ये बोलावायची व तिथं त्यांना मद्यातून बेशुद्धीच्या गोळ्या देऊन, त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, पैसे घेऊन पसार व्हायची. अशाप्रकारे एकूण १६ तरुणांना तिने आतापर्यंत गंडा घातल्याचे समोर आले आहे. नेटफ्लिक्सवरील चित्रपट बघून वेगळं काही तरी करायचं म्हणून तिने असे गुन्हेगारी कृत्य केल्याचं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीने चेन्नई येथील एका तरुणाशी बंबल या डेटिंग अॅपवरून संपर्क साधून, त्याला चॅटिंगद्वारे मैत्रीच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिने संबंधित तरुणाला पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार तो तरुण हॉटेलवरील एका खासगी रूममध्ये तिला भेटण्यासाठी आला. त्यानंतर आरोपी तरुणीने त्याच्या मद्यामध्ये बेशुद्धीच्या गोळ्या टाकल्या व तो तरुण बेशुद्ध होताच त्याच्याजवळील पैसे व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अधिक तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने अधिक गतीने तपास करून आरोपी तरुणीला पकडण्यासठी, बंबल या टेडिंग अॅपवरून बनावट रिक्वेस्ट पाठवून तिला बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर, ओळख वाढवून तिला भेटण्यासाठी बोलावून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून तिला अटक केली.

आरोपी तरुणीची अधिक चौकशी केली असता तिने आतापर्यंत १६ तरुणांना गंडा घातल्याचं समोर आलं. याशिवाय दोन महिलांना देखील तिने फसवले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मोबाईल फोन फोडून तो कचऱ्यात टाकायची –
तरुणी भेटायला आलेल्या तरुणाला बेशुद्ध करून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन बंबल अॅपवरील चॅटिंग डिलीट करायची व तो मोबाईल फोडून कचऱ्यात टाकायची. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावा येत नव्हता. तरुणी उच्चशिक्षित असल्याने, तिने आपण नोकरी करत असल्याचे घरात सांगितले होते. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने केली आहे. .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Highly educated girl cheated 16 young men for lakhs of rupees msr 87 kjp

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या