लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी या मार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था (हायवेज ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम – एचटीएमएस) राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत करण्यात येणारी विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आगामी काळात या महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीला आळा बसून अपघातांचे प्रमाण कमी होण्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) ‘एचटीएमएस’अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये ठरावीक अंतरावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने ओळखणारी शोधप्रणाली (स्पीड डिटेक्शन सिस्टीम), मार्गिका उल्लंघन शोध प्रणाली (लेन डिसिप्लिन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम) आदी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वेगमर्यादा, मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई करून दंड आकारणे, तसेच बेशिस्त वाहनचालकांवर थेट कारवाई करणे शक्य होणार आहे. सध्या वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

आणखी वाचा-सार्वजनिक बांधकाम विभागाची कबुली, पुणे-नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम निकृष्ट

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रवासात अनेक वळणे, घाट, धबधबे आणि इतर निसर्गरम्य ठिकाणे असल्याने मार्गावरील प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवितात. तसेच उपाहारगृह किंवा इतर ठिकाणी वाहने थांबविल्याने वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीच्या या मार्गावर अपघात होत आहेत. त्याअनुषंगाने महामार्गालगत ठरावीक अंतरांवर वाहने थांबविण्याची सुविधा करण्याचेही प्रस्तावित आहे. या शिवाय पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड वाहनांसाठी घाट चढल्यानंतर दोन खास थांबे प्रस्तावित आहेत. या थांब्यांच्या ठिकाणी चहापान आणि स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सध्या घाट चढल्यानंतर जड वाहने महामार्गावरच थांबतात, त्यामुळे अनेकदा पाठीमागून येणारी वाहने जड वाहनांना धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हे खास थांबे तयार करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-रिंगरोडचे भूमीपूजन होणार कधी? समोर आली माहिती…

‘एचटीएमएस’अंतर्गत रस्ते महामंडळाकडून पुण्याकडून मुंबईकडे जाताना आणि मुंबईकडून पुण्याकडे येताना ठरावीक अंतरांवर विविध कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण येऊन अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल, असे रस्ते महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले.