scorecardresearch

‘शेजारी’ चित्रपटाची आज सहस्रचंद्रदर्शनपूर्ती ; हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारित चित्रपट

प्रभात फिल्म कंपनीची निर्मिती असलेला ‘शेजारी’ चित्रपट २५ जानेवारी १९४१ रोजी प्रदर्शित झाला होता. त्या घटनेला मंगळवारी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत.

(छायाचित्रे मे. ए. व्ही. दामले, प्रभात दामले कुटुंबीय यांच्या संग्रहातून)

पुणे : हिंदू-मुस्लीम ऐक्यावर सहजसुंदर पद्धतीने भाष्य करणारा, ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गीताने मनामनात जागविलेली दिवाळी, नटश्रेष्ठ केशवराव दाते आणि गजानन जहागीरदार यांच्या समर्थ अभिनयाने सजलेला, विश्राम बेडेकर यांची कथा-पटकथा आणि संवादलेखन, शांताराम आठवले यांची गीते, व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाने नावाजलेला अशा अनोख्या वैशिष्टय़ांनी अजरामर झालेल्या ‘शेजारी’ चित्रपटाची मंगळवारी (२५ जानेवारी) सहस्रचंद्रदर्शनपूर्ती होत आहे.

प्रभात फिल्म कंपनीची निर्मिती असलेला ‘शेजारी’ चित्रपट २५ जानेवारी १९४१ रोजी प्रदर्शित झाला होता. त्या घटनेला मंगळवारी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. आठ दशके पार केल्यानंतरही रसिकांवर या चित्रपटाची मोहिनी कायम आहे याची प्रचिती नेहमी येत असते. प्रभात फिल्म कंपनीने निर्मिती केलेल्या चित्रपटांच्या मालिकेतील ‘शेजारी’ हा मानाचा तुरा आहे. त्यामुळे ‘शेजारी’च्या सहस्रचंद्रदर्शन पूर्तीचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. पण, करोना निर्बंधांमुळे हा कार्यक्रम करता येत नाही, असे प्रभात फिल्म कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या विष्णूपंत दामले यांचे नातू अनिल दामले यांनी सांगितले. 

चित्रपट अभ्यासकांना अजूनही उत्सुकता

जिवबा आणि मिर्झा हे एकमेकांचे शेजारी, गावामध्ये होत असलेल्या नव्या धरण योजनेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये फूट पाडण्यात आलेले यश, जुने धरण पाडण्यासाठी करण्यात आलेल्या सुरुंगाच्या दारूच्या स्फोटामध्ये हे दोघेही पाण्यात बुडून चिरकालचे शेजारी होतात, असे या चित्रपटाचे कथासूत्र त्या काळी सर्वानाच भावले होते. धरण फुटण्याच्या चित्रीकरणाची वाखाणणी झाली होती. मात्र, हे चित्रीकरण कसे केले गेले याविषयीची उत्सुकता चित्रपट अभ्यासकांमध्ये अजूनही आहे, असे दामले यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लीम ऐक्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून त्या काळी असलेल्या ब्रिटिश सरकारने लोकांना दाखविण्यासाठी ‘शेजारी’ चित्रपटाच्या प्रती विकत घेतल्या होत्या. व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनीसाठी दिग्दर्शित केलेला हा अखेरचा चित्रपट होता. त्यामुळे हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनीमध्येच दाखवावा, अशी खोचक टीका त्या वेळी करण्यात आली होती. 

– अनिल दामले, विष्णूपंत दामले यांचे नातू

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hindu muslim unity movie ysh

ताज्या बातम्या