पुणे : सध्या अनेकांनी हिंदूत्वाची शाल पांघरली आहे. आम्हाला शालीची गरज नाही. हिंदूत्व आमच्या रक्तातच आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ‘भाजप : काल, आज आणि उद्या’ (जगातील सर्वात मोठय़ा राजकीय पक्षाची यशोगाथा) या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुस्तकाचे मूळ लेखक शांतनू गुप्ता, अनुवादक मल्हार पांडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार रणजितसिंह नाईक िनबाळकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, प्रशांत परिचारक, प्रकाशक ऋतुपर्ण कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. तर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी दूरभाष प्रणालीद्वारे संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, हे पुस्तक म्हणजे पक्षाचा इतिहास नाही. तर शाश्वत विचार अमलात आणणारी यंत्रणा असून या विचारांचा भाजप हा वाहक आहे. आत्मभान आणि आत्मतेज हरवलेल्या समाजाला गुलाम करणे सोपे असते. हे काम आधी मुस्लिमांनी आणि नंतर ब्रिटिशांनी केले. ऋग्वेद साडेनऊ हजार वर्षांपूर्वीचे असून आमची संस्कृती तेवढी प्राचीन आहे. आम्हाला विचारांची गरज नाही. तर, आम्हीच जगाला विचार देणारे आहोत. विषमतेच्या विषवल्लीविना आत्मभानाने वाटचाल करून आम्ही विश्वगुरू होऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करोनाचा सामना करताना लस निर्मिती करून सव्वाशे कोटी लोकांना लस पुरवू शकतो हा आत्मविश्वास देशाने प्राप्त केला. गरिबांचे कल्याण आणि हिंदूत्वाचा प्रखर विचार या माध्यमातून भाजपची वाटचाल सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ज्यांचा पहिला आमदार १९८८ मध्ये झाला त्या पक्षाकडून ‘१९८० मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला आम्ही गावोगावी नेले.’ असा चुकीचा प्रचार केला जात आहे, असा टोला शिवसेनेचा नामोल्लेख टाळून चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.