पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचणी येत आहेत. हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश झाल्यास तेथील कचरा संकलित करणे शक्य होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविले असल्याचे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. सात गावांच्या समावेशाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितल्याने समावेशाचा निर्णय लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले.
‘शहरात साचलेला कचरा उचलला जात आहे. मोशी डेपोवर जागा करुन कचरा साठवला जात आहे. डेपोतील सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प धुराड्याची चिमणी पडल्यामुळे चार महिन्यांपासून बंद आहे. चिमणी उभारण्यास विलंब होत असल्याने ठेकेदाराला ऑक्टोबरपासून प्रतिदिन ५० हजार रूपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. २५ नोव्हेंबरपासून हा प्रकल्प सुरु होईल. त्यानंतर सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. त्यामुळे डेपोवर जागा होईल’, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
कचरा प्रश्न सोडविण्यासाठी विविध दहा ठिकाणी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र महापालिका उभारणार आहे. दुर्गंधीमुक्त केंद्रांसाठी जागा निश्चित केल्या असून सविस्तर प्रकल्प आराखडे (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेला लागून असलेल्या आयटी पार्क हिंजवडीसह गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गेल्या साडेअकरा वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावाला फेब्रुवारी २०१५ मध्ये सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. जून २०१५ मध्ये हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. याबाबत महापालिकेने सातत्याने स्मरणपत्रही पाठविले. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झाला नाही.
ग्रामपंचायतीवर ताण
आयटी पार्कमुळे जगाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण झालेली हिंजवडी समस्यांच्या गर्तेत आहे. सद्य:स्थितीत हिंजवडीत ग्रामपंचायत असून, वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीवर ताण येत आहे. अरुंद रस्ते, त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोडी, कचरा, पाणी, सांडपाणी वाहिन्यांसह विविध सक्षम पायाभूत सुविधांचा हिंजवडीत अभाव आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह अभियंते त्रस्त असून, त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. विविध शासकीय यंत्रणांसह ग्रामपंचायत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याने हिंजवडीचा महापालिकेत समावेश करण्याची अभियंत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. आता शहरातील कचरा कोंडीमुळे समावेश लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रावेतला केवळ कचरा प्रक्रिया केंद्र
दुसऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी रावेत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) २५ एकर जागेची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. तेथे कचरा साठविला जाणार नाही. केवळ प्रक्रिया केंद्र असेल. अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यातून दुर्गंधीही येणार नाही. असा प्रकल्प शहरात पहिल्यांदाच होत असल्याने नागरिकांच्या मनात गैरसमज असून तो दूर केला जाईल, असेही आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पवना बंदिस्त जलवाहिनी
शहराच्या वाढणाऱ्या लोकसंख्येला अतिरिक्त पाण्याची गरज आहे. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक झाली असून दुसरीही बैठक लवकरच होईल. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करित आहे. सन २०५१ पर्यंतच्या पाण्याचे मोजमाप करुन जेवढे पाणी उरेल, तेवढे पाणी पिंपरीला द्यावा असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठिवल्याचेही त्यांनी सांगितले.
