पुणे : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच रस्त्यांवर खड्डे बुजविण्यात चालढकल होत असल्यामुळे खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. चाकण आणि हिंजवडी परिसरातील खड्डे, पर्जन्य, जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन आणि यु-टर्नचे नियोजन तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलीस, महामार्ग आणि संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. अतिक्रमणे हटविणे, आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करणे, कामांचे नियोजन करून प्रक्रिया पूर्ण तयार ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी केली.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, चाकण परिसरातील हंगामी स्वरूपाची अतिक्रमणे तातडीने हटवावीत. अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करावेत. परवानगी घेऊन झालेल्या बांधकामांच्या बाबतीत पर्यायी मार्गाने नाला वळविण्यासाठी आवश्यक जागेचे नियोजन करावे. एमआयडीसी आणि पीएमआरडीएने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची माहिती संकलित करावी. वाहतुकीचे प्रमाण, वाहनांची दिशा आणि भविष्यातील वाहतूक वाढ यांचा अभ्यास करून रस्त्यांची रचना निश्चित करावी.’
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. केवळ खड्डे बुजविण्याऐवजी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी पावसाळी पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाहतूक नियोजनासाठी आयटीएमएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशनचा वापर करून रस्त्यांच्या डिझाइनमध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश करण्यावरही चर्चा झाली.
राष्ट्रीय महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे बस आणि अन्य वाहने थांबविल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने केवळ अधिकृत बसथांबे आणि नियोजित बस डेपोवरच वाहने थांबतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आली आहे. अनधिकृत थांबे आणि पार्किंगविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई होईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
