पिंपरी : लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीवर धारदार चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर प्रियकरानेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना हिंजवडी येथे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
प्रियकरावर गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २४ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हिंजवडीत एका खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी आणि तरूणीमध्ये एक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. सोमवारी पहाटे फिर्यादी तरुणी बहिणीसमवेत कामावर जात असताना आरोपीने तिला अडवले. तुझ्यामुळे मला कामावरून काढून टाकले आहे. तू माझ्याबरोबर का बोलत नाही, आपण लग्न करू, असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादी तरुणीने लग्नास नकार दिला. त्यावरून आरोपीने तिला खाली पाडले. त्याने तिच्या छातीवर, पाठीवर आणि हातावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर स्वत: उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. फौजदार ताकतोडे तपास करीत आहेत.
अनधिकृतपणे राहणार्या अफगाणी विद्यार्थ्यावर पोलिसांची कारवाई
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही शहरात अनधिकृतपणे राहणार्या अफगाणी विद्यार्थ्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले.
दान्यार हुसेन (वय २६, रा. अफगाणिस्तान) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर आता मायदेशी परत पाठवण्याची (डिपोर्टेशन) कारवाई केली जात आहे. एटीबी आणि एफआरओच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधमोहीम राबवली. एटीबीचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांना दान्यार हुसेन हा बावधन बुद्रुक येथील सिद्धार्थनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बावधन पोलिसांच्या मदतीने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, तो शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तो जानेवारी २०२६ पासून महाविद्यालयात गैरहजर असल्याचे समोर आले. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्याच्या विद्यार्थी व्हिसाची व भारतात राहण्याची मुदत (रेसिडेन्शियल परमिट) ३१ जानेवारी २०२६ रोजीच संपली होती. कोणतीही मुदतवाढ न घेता तो बावधन परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत होता.
परदेशी नागरिक सदनिका, बंगला, हॉटेल अथवा रूममध्ये वास्तव्यास आल्यास मालकाने २४ तासांच्या आत ‘सी-फॉर्म’ भरून एफआरओकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नियम मोडल्यास संबंधित घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत परिसरातील संशयास्पद परदेशी नागरिकांची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांनी केले आहे.
