Pune Hinjewadi IT Park Job Scam News: माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचारी कपातीवरून मोठ्या प्रमाणात चर्चा सातत्याने सुरू असते. त्यातच एका बड्या आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मोठा गदारोळ उडाला आहे. आता यात आणखी भर पडली असून, हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो तरुण आयटी अभियंत्यांवर नोकरी नसल्याने रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एका आयटी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आयटी अभियंत्यांना चांगले पॅकेज देण्याचे आश्वासन ही कंपनी देत असे. त्यासाठी नवीन उमेदवारांकडून एक ते दीड लाख रुपये घेतले जात. लातूरमधील एका तरुण अभियंत्याकडून कंपनीने अशाच प्रकारे पैसे घेतले. त्याला वार्षिक तीन लाख रुपयांचे पॅकेज देण्याची हमी देण्यात आली. तसेच तीन महिने प्रशिक्षण देण्यात येईल असेही सांगण्यात आले. या प्रशिक्षण काळात त्याला दरमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जाईल, असे कंपनीचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात तीन महिन्यांच्या प्रशिक्षण काळात त्याला कोणतेही मानधन देण्यात आले नाही.
या तरुण अभियंत्याने याबाबत वारंवार कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली. त्यावेळी व्यवस्थापनाने त्याला मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यात येणार असून त्यासाठी हे कमिशन असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात नोकरी आणि प्रशिक्षण काळातील मानधनाची पैसेही दिले गेले नाहीत. यामुळे अखेर या तरुणाने फोरम फोर आयटी एम्प्लॉईज संघटनेकडे धाव घेतली. त्यावेळी अशाप्रकारे अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. संबंधित कंपनीने शेकडो तरुण अभियंता नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले.
पोलिसांकडून कारवाई
फोरम फोर आयटी एम्प्लॉईज संघटनेने या तरुण अभियंत्यांसह हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेतली. कंपनीने केलेली फसवणूक आणि नवीन उमेदवारांकडून उकळलेले पैसे याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तरुणांची तक्रार दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीने आतापर्यंत सुमारे सव्वाशे तरुण उमेदवारांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाऊ शकतो. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या उमेदवारांनी हिंजवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नोकरी गैरव्यवहारात वाढ
गेल्या वर्षभरापासून आयटी क्षेत्रात कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहे. भूराजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत घसरण होत असून त्याचा फटका आयटी क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या आयटी कंपन्यांकडून सातत्याने कर्मचारी कपात सुरू आहे. ही कपात सुरू असताना नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे. त्यामुळे तरुण अभियंत्यांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. याचाच फायदा घेऊन अनेक आयटी सल्लागार कंपन्या या तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक करीत आहेत. कामगार विभागानेही याची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.
