पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतुकीला गती देण्यासाठी मेट्रो मार्गाभोवती अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून मेट्रो मार्गाखालील मुख्य रस्त्यावरील आठ स्थानकांशी जोडणाऱ्या २१ रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. पुढील महिन्यांत मेट्रो सुरू होण्याची शक्यता असल्याने मेट्रो मार्गाशी थेट जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाखालील मुख्य रस्ता १० किलोमीटरचा आहे. ‘एमआयडीसी’ आणि ‘पीएमआरडीए’ यांच्या हद्दीत तो विभागला गेलेला आहे. या मार्गावर आठ स्थानके आहेत. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकांपर्यंत जलद पोहोचणे शक्य व्हावे, यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’चा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार, प्रत्येक स्थानकाच्या पाचशे मीटर ते दीड किलोमीटर परिघात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. यात सध्याच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्याबरोबरच नवीन रस्तेही विकसित करण्यात येतील. यामध्ये एकूण २१ रस्त्यांचा समावेश असून, त्यांची लांबी सुमारे २० किलोमीटर आहे. या आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ४२६ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यामुळे ही कामे तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’

१) मेगापोलीस सर्कल स्थानक – आयटी पार्क टप्पा क्रमांक तीनमधील रस्ता, क्रिकेट मैदानाकडे जाणारा रस्ता, भोईरवाडी रस्ता, टप्पा क्रमांक तीनमधील अंतर्गत रस्ते असे एकूण ४ किलोमीटर लांबीचे रस्ते.

२) क्वाड्रन सर्कल स्थानक – टप्पा क्रमांक तीनमधील दोन रस्ते आणि अंतर्गत रस्ते असे एकूण ३.६ किलोमीटर लांबीचे रस्ते.

३) डोहरल स्थानक – हाय माऊंट रस्ता हा १.५ किलोमीटर लांबीचा रस्ता.

४) इन्फोसिस टप्पा दोन स्थानक – एमर्सन इनोव्हेटिव्हा हा ५०० मीटर लांबीचा रस्ता.

५) विप्रो स्थानक – पार्क डिस्ट्रिक्ट हा १.१ किलोमीटर लांबीचा रस्ता.

६) पॅल इंडिया स्थानक – विबग्योर शाळा रस्ता, लक्ष्मी चौक रस्ता, हिंजवडी कासारसाई रस्ता असे १.५ किलोमीटर लांबीचे रस्ते.

७) शिवाजी चौक स्थानक – टप्पा क्रमांक एकमधील रस्ता, राजीव गांधी रस्ता, आयटूआयटी महाविद्यालय रस्ता, मारूंजे रस्ता, डांगे चौक रस्ता असे एकूण ४.८ किलोमीटर लांबीचे रस्ते.

८) हिंजवडी स्थानक – नवीन वाकड ते हिंजवडी लिंक रस्ता, बांधकाम सुरू असलेला रस्ता. हिराई सीताई रस्ता असे १.८ किलोमीटर लांबीचे रस्ते.