पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील म्हाळुंगे भागात आयटी कर्मचाऱ्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या भागाचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला असूनही वाहतूककोंडी, अपुरे रस्ते, पथदिव्यांची समस्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण हे गंभीर प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नांवर आयटीयन्स आणि स्थानिक रहिवाशांनी गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरून मोर्चाही काढला होता. मात्र, त्यावेळी दिलेले आश्वासन पुणे महापालिकेने पूर्ण केले नाही. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हाळुंगे टाऊनशिप रहिवासी संघाने निर्वाणीचा इशारा दिला आहे.

म्हाळुंगे-माण परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कशी नजीकता यामुळे वाहतुकीसाठी सध्याचे रस्ते अपुरे पडत आहेत. सकाळी व सायंकाळच्या कार्यालयीन वेळेत, तसेच शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून, त्याचा परिणाम विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, कार्यालयीन कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन सेवांच्या वाहतुकीवर होत असल्याचे म्हाळुंगे टाऊनशिप रहिवासी संघाने म्हटले आहे.

म्हाळुंगे-माण परिसरातील वाहतूक समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रादेशिक आराखड्यांतर्गत प्रस्तावित २४ मीटर रस्ता अथवा म्हाळुंगे-माण नगर नियोजन योजनेंतर्गत प्रस्तावित ३६ मीटर रस्ता तातडीने विकसित करावा. तसेच, सूस-म्हाळुंगे-हिंजवडी रस्त्याचे कामही लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. या कामांसाठी प्रशासकीय, तांत्रिक, भूसंपादन व निधीविषयक प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना काम सुरू होण्याची तारीख, टप्पानिहाय कामाची रूपरेषा, अपेक्षित पूर्णत्वाची तारीख आणि उपलब्ध निधी याबाबत अधिकृत माहिती देण्यात यावी. नियोजित रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गर्दीच्या वेळेत किमान १० वाहतूक वॉर्डन तैनात करण्यात यावेत, अशी मागणी रहिवासी संघाने केली आहे.

अधिकृत पत्राची प्रतीक्षा

म्हाळुंगे-माणमधील प्रश्नांवर २२ ऑगस्टला म्हाळुंगे टाऊनशिप रहिवासी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून या आश्वासनाची अधिकृत प्रत महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. नागरिकांनी अधिकृत उत्तरासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची आणि या प्रश्नाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची आहे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रस्ते, पथदिवे आणि वाहतूक हे नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित मूलभूत प्रश्न असताना त्याकडे अशा प्रकारे विलंबाने पाहिले जाणे अत्यंत खेदजनक आहे, अशी नाराजी संघाने व्यक्त केली.

थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद

याप्रकरणी रहिवासी संघाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, म्हाळुंगे-माण परिसरासाठी दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा, नियोजित नगररचना आराखड्यातील रस्त्यांची अंमलबजावणी करावी, पर्यायी मार्ग विकसित करावेत, चौकांचे व्यवस्थापन सुधारावे, पादचारी सुरक्षा वाढवावी आणि शाळा परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करावे, अशी आमची मागणी आहे. याबाबत महापालिकेने कालबद्ध कार्यवाही न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.