पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे पाऊल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उचलले आहे. ‘एमआयडीसी’ने प्रतिदिन १० टन क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे आयटी पार्कमधील कचऱ्याच्या व्यवस्थापनासोबतच ‘बायो-सीएनजी’ निर्मितीही केली जाणार आहे. हेच इंधन पुढे वाहनांना पुरविले जाणार आहे. यातून आयटी पार्कमधील वाहतूकही पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कचा गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तार झाला. त्यामुळे आयटी पार्कमधील कचऱ्याची समस्याही गंभीर बनली. आयटी पार्कमध्ये निर्माण होणारा कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर आयटी पार्कमध्येच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव समोर आला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या उभारणीच्या दिशेने पावले उचलण्यात आली. आयटी पार्कमध्ये दोन हेक्टर जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी एकूण ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘एमआयडीसी’ने निविदा काढली होती. त्यात ‘अभय बायोसीएनजी’ कंपनीला हे काम मिळाले.

या प्रकल्पाच्या उभारणीचे काम मार्च २०२४ मध्ये सुरू झाले. ते आता अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारण्यात येत आहे. ‘या प्रकल्पाची उभारणी करणारी कंपनी १० वर्षे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. आयटी पार्कमधील कचरा संकलनाचे कामही संबंधित कंपनी करणार आहे. ही कंपनी नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा असे विलगीकरण करून त्याचे संकलन करेल. याचबरोबर आयटी पार्कमधील मोकळ्या जागा आणि रस्त्यांची सफाईही या कंपनीकडे असणार आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न आहेत,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी दिली.

प्रकल्पाची वैशिष्टे

एकूण कचरा क्षमता – १० टन प्रतिदिन

बायो-सीएनजी निर्मिती – १५० ते २०० किलो प्रतिदिन

आयटी पार्कमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा प्रकल्प डिसेंबर महिन्यात कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यामुळे आयटी पार्कमधील कचऱ्याची समस्या सुटण्याबरोबरच त्यातून ‘बायो-सीएनजी’ निर्मितीही होणार आहे.

  • नीलेश मोढवे, अधीक्षक अभियंता, एमआयडीसी

आयटी पार्कमध्ये दररोज सरासरी १० टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पातून दररोज १५० ते २०० किलो ‘बायो-सीएनजी’ निर्मिती होईल. प्रकल्पाच्या परिसरात सीएनजी पंप सुरू करून हा ‘बायो-सीएनजी’ वाहनांना वितरित करण्यात येईल.

  • कांचन भालेराव, मुख्याधिकारी, अभय बायो सीएनजी