पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जलकोंडी निर्माण झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) इतर शासकीय यंत्रणांनी पावले उचलली आहेत. ‘आयटी पार्क’मधील कामे पूर्ण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ आयुक्तांनी सर्व शासकीय यंत्रणांची बुधवारी संयुक्त बैठक घेऊन कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे ‘आयटी पार्क’मधील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था समोर आली होती. त्यानंतर सर्व शासकीय यंत्रणांकडून त्यांच्या पातळीवर ‘आयटी पार्क’मध्ये उपाययोजना सुरू झाल्या. त्यांचा आढावा घेण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी बुधवारी शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांसह ‘एमआयडीसी’, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण, ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची तपासणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी पार्क परिसरात अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जात आहे. यामुळे नाले तुंबण्यासह मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर ‘पीएमआरडीए’ आणि ‘एमआयडीसी’ने आपापल्या हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आढळल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
‘जलप्रवाह खुले करणार’
आयटी पार्क परिसरातील अनेक नैसर्गिक जलप्रवाह बुजविण्यात अथवा अडविण्यात आले आहेत. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात पुन्हा जलकोंडी होण्याचा धोका आहे. आयटी पार्क परिसरात पाच ठिकाणी नैसर्गिक जलप्रवाह अडविण्यात आल्याचे आढळले आहे. ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामपंचायतींच्या मदतीने हे जलप्रवाह खुले करावेत. तसेच, जलप्रवाहांवर अतिक्रमण आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले. जलप्रवाह खुले करण्यासह सर्व उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मेट्रोला राडारोडा हटविण्याचे निर्देश
‘आयटी पार्क’मध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेखाली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा पसरला आहे. पावसाळ्यात या राडारोड्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच, या रस्त्यांची दुरुस्ती करून ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत, हा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर आयुक्तांनी या मेट्रोचे काम करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ कंपनीला १५ एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक तीन येथील डोहलर कंपनीसमोर सर्वाधिक पाणी साचले होते. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती ‘पीएमआरडीए’ आयुक्तांनी घेतली. तेथील काम ‘एमआयडीसी’ने तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. हे काम सुरू असून, ते लवकरात लवकर पूर्ण होईल.- राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
आयटी पार्क परिसरात गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील. त्या वेळी हे प्रकल्प बंद असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अथवा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
