पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात रस्ते, वीज, पाणी, कचऱ्याची गंभीर समस्या आहे. प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नाही. नागरिकांचे मुलभूत प्रश्न सुटत नसतील, तर हे सरकार आणि प्रशासनाचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी मनात आणले, तर या भागातील प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात. परंतु, प्रश्न साेडवण्यापेक्षा राजकीय पक्ष फाेडण्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
हिंजवडी आयटी पार्कमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची ठाकरे यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बाेलत हाेते. १५ ते २० लाख नागरिक आयटी क्षेत्रावर अवलंबून आहेत. मात्र, या भागात वाहतूककाेंडी, रस्ते, पाणी, वीज, कचरा यांसारख्या मूलभूत समस्या वाढल्या आहेत. रस्त्यांवर पदपथ नाहीत, खड्डे पडले आहेत. राज्यकर्त्यांना हे दिसत नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला. हिंजवडी आयटी पार्कमधील समस्याप्रकरणी गतवर्षी येथील उद्याेजक, संघटना, नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले हाेते.
मात्र, मागील वर्षभरात रस्ते, वाहतूककाेंडीसह सर्व समस्या अद्याप ‘जैसे थे’ आहेत. मुख्यमंत्र्यांना सगळीकडे चांगली परिस्थिती असल्याचे वाटत असते. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष हिंजवडीत येऊन पाहणी करावी. सरकारने मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले, तरी या भागातील रहिवाशांना माेठा दिलासा मिळू शकताे. मुख्यमंत्र्यांनी मनात आणून एका टेबलवर, एका रांगेत सगळ्या यंत्रणांना बसवावे. दर महिन्याला बैठक घ्यावी. त्यांनी काय काम केले, याचा आढावा घ्यावा. त्यांनी ठरविले, तर चुटकीसरशी सर्व प्रश्न सुटतील, असेही ठाकरे म्हणाले.
मेट्राे सुरू करा
हिंजवडीत अनेक वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. काहीच स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून फक्त चाचणी सुरू आहे. मेट्राेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांची तारीख मिळत नसल्याचे चित्र आहे. उद्घाटनाची सगळी नाटके बाजूला ठेवून, मुहूर्त जेव्हा मिळेल तेव्हा मुहूर्तावर काढा. परंतु, लोकांसाठी मेट्रो सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली.
‘चार वर्षांत एकही नवीन कंपनी नाही’
हिंजवडी आयटी पार्क औद्याेगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा भाग आहे. वाहतूककाेंडीमुळे हिंजवडी टप्पा तीनमधून टप्पा एकला जाण्यासाठी दीड ते दाेन तास लागत आहेत. या भागात मूलभूत प्रश्नांमुळे उद्याेजक हैराण असून, नवीन कंपन्या येत नाहीत. मागील चार वर्षांत एकही नवीन कंपनी या परिसरात आली नाही. आहे त्याच कंपन्या बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचेही ठाकरे म्हणाले.
‘उद्याेगमंत्र्यांचे अन् डांबराचे घट्ट नाते’
चाकण एमआयडीसी परिसरात उद्याेगमंत्री येणार म्हटले, की रस्त्यांची दुरुस्ती होते. मात्र, दौरा संपताच परिस्थिती पूर्ववत होते. उद्याेगमंत्री आणि डांबराचे घट्ट नाते आहे. ते आल्यावर डांबर टिकते की नाही हाच खरा प्रश्न आहे. एका भेटीने काम होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन चाकण, हिंजवडीतील प्रलंबित प्रश्न सोडवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
