पुणे : ‘मला कामावर जाण्यास दररोज अर्धा तास लागतो मात्र, काही दिवसांपासून हा वेळ सव्वा ते दीड तासांवर गेला आहे,’ ही प्रतिक्रिया आहे एका आयटी कर्मचाऱ्याची. हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या केवळ एका कर्मचाऱ्याची व्यथा नसून, लाखो कर्मचाऱ्यांचे सध्या हेच हाल सुरू आहेत. खराब आणि खड्डेमय रस्ते, वाहनांच्या लांब रांगा आणि अगदी रुग्णवाहिका जाण्यासही मार्ग नाही, असे चित्र दररोज आयटी पार्कमधील रस्त्यांवर दिसू लागले आहे.

हिंजवडी आयटी पार्क यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेमुळे चर्चेत आले. गेल्या वर्षी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे आयटी पार्क हे वॉटर पार्क बनले होते. यंदा खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे पूर्ण आयटी पार्कच खड्ड्यात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयटी पार्कमधील सर्वच रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात खराब झालीहे. याच जोडीला मुंबई-बंगळुरू महामार्गावरून आयटी पार्कला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर भूमकर चौक, पुनावळे आणि ताथवडे येथे तीन भुयारी मार्ग आहेत. या ठिकाणी सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडी होते. याचाच परिणाम होऊन या मार्गांच्या ठिकाणी तासनतास वाहतूक कोंडीत वाहनचालक अडकून पडत आहेत.

आयटी पार्कमध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या मार्गाखालील रस्त्याची अवस्थाही अतिशय खराब आहे. या मेट्रो मार्गाखालील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांना त्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागत आहे. याचबरोबर माण ते महाळुंगे या रस्त्याची अवस्थाही अतिशय खराब आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचते तसेच, खड्डेही मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे त्यावरून वाहन चालविणेही अवघड बनले आहे. तसेच, जगताप चौकात यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळेही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

मेट्रो मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेट्रो मार्गाखालील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीला दिले आहेत. त्यांच्याकडून पुढील दोन दिवसांत या रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याची दुरूस्ती केली जाईल. याचबरोबर आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहा पर्यायी रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

आयटी पार्कमधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कोल्ड मिक्सच्या मदतीने खड्डे बुजविण्यात येत आहेत. जगताप चौकात पावसाचे पाणी साचत असल्याने त्या ठिकाणी सांडपाणी वाहिन्या बसविण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. याचबरोबर माण ते महाळुंगे या रस्त्याची दुरुस्तीही करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी स्पष्ट केले.

पर्यायी रस्ते रखडले

प्रशासकीय यंत्रणांकडून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ती पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक प्रस्तावित रस्त्यांची कामे भूसंपादनाअभावी रखडली आहेत. पर्यायी रस्ते नसल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर बाणेर ते ताथवडेदरम्यान सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही दुरुस्ती सुरू केली आहे, असे फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले.