पिंपरी : ‘हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचे विशेष लक्ष आहे. उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही त्याचीच परिणती आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यास प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वाकड येथील मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजित भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले आहे. पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजाराहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. त्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल’.

‘शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम केल्यास गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था निर्माण होते. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची’, ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.