पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रानंतर आता हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात काम करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना दररोज यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. या आंदोलनात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली असून येथील उद्योग बाहेर जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्कमधील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याबाबत पोस्ट केली असून, त्यात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर पुण्याची ओळख ‘आयटी हब’ म्हणून निर्माण करणाऱ्या हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसराची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, दररोजची प्रचंड वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक रहिवाशांना मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. येथील दुरवस्थेबाबत मी स्वतः शासन आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. गेल्या २ वर्षांत खड्डे आणि अपघातांमुळे २० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे, तरीही राज्य सरकारला जाग येत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे.
गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध आस्थापनांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ‘सिंगल पॉईंट अथॉरिटी’ नेमण्याची घोषणा झाली. परंतु, वर्षभरानंतरही या अथॉरिटीच्या माध्यमातून एकही मुख्य प्रश्न सुटलेला नाही. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए), महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्यात समन्वय नसल्याने कामे रखडली आहेत. परिणामी येथील उद्योग इतरत्र जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मोठ्या परिश्रमाने आणि दूरदृष्टीने उभारलेला येथील आयटी उद्योग केवळ पायाभूत सुविधांच्या दुर्दशेमुळे इतरत्र जाण्याच्या मानसिकतेमध्ये असेल तर राज्य सरकार हिंजवडीच्या समस्यांबाबत अजिबात गंभीर नाही असेच म्हणावे लागेल, असे सुळे यांनी म्हटले आहे.
केवळ घोषणा करायच्या आणि बैठकांचे सोपस्कार पाडायचे, या पलीकडे प्रत्यक्ष काहीही काम झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मी नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कारण स्थानिक नागरिक, गृहिणी आणि तरुण अभियंते जेव्हा आपल्या हक्कांसाठी आंदोलनाची हाक देतात, तेव्हा ते या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया चाकण पाठोपाठ पुण्याच्या परिसरातील दुसऱ्या मोठ्या औद्योगिक वसाहतीचे अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या आणि ते प्राधान्याने सोडवा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
