पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये भारतीय आणि अमेरिकेच्या विशेष सुरक्षा दलांचा संयुक्त सुरक्षा सराव पार पडला. अमेरिकेच्या १७ विशेष कमांडोंसह भारतीय नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) १०० हून अधिक ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंनी या पाच तासांच्या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला. जागतिक स्तरावरील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या या सरावात दहशतवादी हल्ला आणि संवेदनशील परिसर सुरक्षित करण्यासारख्या परिस्थितींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीच्या आवारात सायरन वाजवत बुधवारी सायंकाळी विशेष सुरक्षा दलाचा ताफा दाखल झाला. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज एनएसजीचे ‘ब्लॅक कॅट’ कमांडो आणि अमेरिकन विशेष कमांडो वाहनांतून उतरून नियोजित ठिकाणी पोहोचले. सुरुवातीला प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याचा समज झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हा पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये असून, हजारो भारतीय आणि परदेशी कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील मानला जातो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद, समन्वय आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी अशा प्रकारचे मॉकड्रिल नियमितपणे आयोजित केले जातात.
अचानक झालेल्या या मोहिमेमुळे सुरुवातीला नागरिकांमध्ये उत्सुकता व आश्चर्य पाहायला मिळाले. मात्र, हे मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास त्यास प्रतिकार करण्यासाठी काय कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी. कशा प्रकारे कार्यवाही करावी, फस्ट रिस्पॉनडर कोण असणार, आऊटडर कार्टन कोणी व कशापद्धतीने करावे, इतरत्र कॉर्डन कसे करावे, वाहतूक नियंत्रण कसे करावे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कारवाई, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाईबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
