पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आता शटल बससेवा सुरू करण्यात आली आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला असून, उपयोजन (अॅप) आधारित ही कोको राईड्स सेवा मंगळवारपासून सुरू झाली. आयटी पार्कमधील ८० हून अधिक कंपन्यांतील सुमारे सव्वा लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने (एचआयए) कोको राईड्स सेवेसाठी रूटमॅटिक कंपनीसोबत भागीदारी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या सेवेसाठी सहकार्य केले आहे. आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयापासून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एचआयएचे अध्यक्ष सुब्रह्णण्यम राधाकृष्णन, रूटमॅटिकचे संस्थापक व मुख्याधिकारी श्रीराम कन्नन आणि कार्यकारी संचालक कविता रामचंद्रगौडा आदी उपस्थित होते. ही उपयोजन आधारित सेवा असून, एचआयएच्या सदस्य कंपन्यांना या बससेवेतील आसने आरक्षित करण्यासह नवीन मार्गांचे नियोजन करता येणार आहे.
यावेळी एचआयएचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम राधाकृष्णन म्हणाले की, हिंडवडी आयटी पार्कमध्ये सामाईक वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी उद्योगांनी एकत्र येऊन पाऊल उचलले आहे. यातून व्यवहार्य असा कोको राईड्सचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, त्यांचा प्रवास सुकर होणार आहे. याचबरोबर शहराच्या पायाभूत सुविधांवर येणारा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी रुटमॅटिकचे संस्थापक व मुख्याधिकारी श्रीराम कन्नन म्हणाले की, देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान केंद्रामध्ये सध्या पायाभूत सुविधांची गंभीर समस्या आहे. वाढत्या कर्मचारी संख्येचा ताण या पायाभूत सुविधा सहन करू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात कंपन्यांना एकत्र येऊन कोको राईड्ससारखी सामाईक, विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था सुरू करावी लागेल. आता पुण्यात आम्ही ही सेवा सुरू करीत आहोत.
मध्यवर्ती नियंत्रण कक्ष
कोको राईड्स सेवेवर देखरेख ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बसच्या हालचालीवर या कक्षातून नजर ठेवली जाणार आहे. याचबरोबर आयटी कर्मचारी कोको राईड्स उपयोजनाच्या (अॅप) आधारे या सेवेचा त्यांच्यानजीकचा थांबा आणि मार्ग निवडू शकतात. तसेच, या बसमधील आसनही आरक्षित करू शकतात.
कोको राईड्स सेवा
- एकूण बस – ८०
- मार्ग – ७०
- थांबे – ५००
