पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली असून अनेक पीएमपीएमएल बसथांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आयटी पार्कमधील रस्त्यावर कोंडीचे चित्र नित्याचेच बनले आहे. आता या परिस्थितीत सुधारणा करण्याचे पाऊल पडू लागले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या काही प्रमुख बसथांब्यांचे स्थान बदलण्यात आले आहे.
यामध्ये सावतमाळी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेझा-९, टाटा टी-जंक्शन, विप्रो फेज २ सर्कल, पॉवर हाऊस स्टेशन आणि एमआयडीसी सर्कल या बसथांब्यांचा समावेश आहे. या ठिकाणी बस थांबत अस ल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे कारण समोर आले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फेज १ सर्कल हा रस्ता एकेरी (वन-वे) करण्यात आल्यानंतर पर्सिस्टंट कंपनीसमोरील बसथांबाही हटवण्यात आला आहे. या बदलामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी बसथांबे स्थलांतरित करणार
हिंजवडी वाहतूक पोलीस विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी पुढील काळात आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत. विशेषतः मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आणखी काही बसथांबे स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे (रॉंग साईड ड्रायव्हिंग) टाळणे, गर्दीच्या चौकांजवळ अनावश्यक पिक-अप आणि ड्रॉप टाळणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर आणखी सुधारणा हिंजवडी परिसरातील वाढती आयटी कंपन्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन हा मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळे बसथांबे स्थलांतर, रस्त्यांचे एकेरीकरण आणि मेट्रो सेवा यांसारख्या उपाययोजनांमुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा फोरम फोर आयटी एम्प्लॉईज संघटनेने व्यक्त केली आह.
