पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील खड्डेमय रस्ते, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हे चित्र आता बदलणार आहे. आयटी पार्कमधील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मोहीम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हाती घेतली आहे. याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी ते बाणेर या रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
बाणेरमधून माण, म्हाळुंगेमार्गे हिंजवडी आयटी पार्कमधील टप्पा एक व टप्पा तीनला जोडणारा रस्ता गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे. या परिसरातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची माण- म्हाळुंगे नगर नियोजन (टीपी) योजना प्रलंबित आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द झाल्याने ही टीपी योजना कधी होणार, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. हिंजवडी ते बाणेर हा सहा पदरी रस्ता प्रस्तावित असून, त्याची लांबी ६ किलोमीटर आहे. त्यातील अडीच किलोमीटरचे काम पूर्ण असून, साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम प्रलंबित आहे.
हिंजवडी ते बाणेर रस्त्याचे एमआयडीसी सर्कल ते माण गावापर्यंतचे १.८ किलोमीटरचे काम एमआयडीसीकडून येत्या दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या बाणेरच्या बाजूचे काम १.६ किलोमीटरचे काम भूसंपादनाअभावी पूर्ण झालेले नाही. एमआयडीसी सर्कल ते माण गावापर्यंतच्या रस्त्यांची रुंदी ८.५ मीटर आहे. हा रस्ता सहा पदरी प्रस्तावित असला तरी केवळ तीन पदरी रस्त्याएवढी जागा सध्या उपलब्ध आहे. रस्ता रुंदीकरणाला काही जागा मालकांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यामुळे सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या ८.५ मीटर रुंदीच्या रस्त्याची खड्डे दुरुस्ती आणि डांबरीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पुढे माण गावातून बाणेरमध्ये राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. या रस्त्यामुळे बाणेरमधून म्हाळुंगेमार्गे आयटी पार्क टप्पा एक व तीनमध्ये जलद पोहोचणे शक्य होणार आहे.
खड्डे बुजवून डांबरीकरण
आयटी पार्कमधील खड्डेमय रस्त्यांवरून सातत्याने टीका केली जात आहे. आता एमआयडीसीकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवून त्या ठिकाणी डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित केला जात आहे. आयटी पार्कमध्ये पांडवनगर चौक, लक्ष्मी चौक, मेगापोलीस सर्कल, शिवाजी चौक आणि टी जंक्शन या भागातील १० हजार चौरस मीटरच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात आले आहे.
आयटी पार्कमध्ये रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. याचबरोबर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, हिंजवडी ते बाणेर रस्त्याचे कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. – राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
