पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील अनेक गृहनिर्माण संस्था आणि कंपन्या सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पावसाळी वाहिन्यांमध्ये सोडत आहे. त्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ( एसटीपी) सुरू नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) आता नियम भंग करणाऱ्यांना दणका देण्याचे पाऊल उचलले आहे.
आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक दोनमध्ये डोहलर कंपनीच्या परिसरातील गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांकडून सांडपाणी थेट पावसाळी वाहिन्यांमध्ये सोडले जात आहे. गेल्या वर्षी आयटी पार्कमध्ये पावसाळ्यात पाणी साचून जलकोंडी निर्माण झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एमआयडीसीकडून पावसाळापूर्व कामांना गती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी डोहलर कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तेथील पावसाळी वाहिन्यांचे काम एमआयडीसीकडून सुरू आहे. पावसाळी वाहिन्यांचे काम करीत असताना अनेक गृहनिर्माण संस्था आणि कंपन्या थेट सांडपाणी बाहेर सोडत असल्याची बाब निदर्शनास आली.
या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांकडून सांडपाणी थेट पावसाळी वाहिन्यांमध्ये सोडले जात आहे. हे काळे आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी असल्याने सफाई कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कामगारही सफाईसाठी वाहिन्यांमध्ये उतरण्यास तयार नाहीत. हे दूषित पाणी पुढे पीएमआरडीएच्या हद्दीतील शेतजमिनींमध्ये जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनीही तक्रारी केल्या आहेत. संबंधितांनी हे सांडपाणी बाहेर सोडणे तत्काळ बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
सांडपाण्यावर प्रक्रिया गरजेची
गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असून, त्यांनी दूषित पाणी बाहेर सोडू नये. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांकडून पावसाळी वाहिन्यांमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे अधिकार असून, त्यांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे, असे पीएमआरडीएचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी सांगितले.
कामगारांच्या आरोग्यास धोका
आयटी पार्कमधील पावसाळी वाहिन्यांचे काम करताना त्यात थेट सांडपाणी सोडले जात असल्याची बाब उघडकीस आली. या दूषित पाण्यामुळे सफाई करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना नोटिसा बजावून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी स्पष्ट केले.
पाहणी मोहीम सुरू
आयटी पार्कमध्ये अनेक कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आयटी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांकडून नियमभंग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी नमूद केले.
