पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील थिंकटेक इंडिया आयटी कंपनीने रातोरात कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे कंपनीत काम करणारे सातशे आयटी अभियंते रस्त्यावर आले. हा निर्णय कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याला आता महागात पडला आहे. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी फसवणुकीची तक्रार या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कंपनीचा मुख्याधिकारी हर्षल ठाकरे यांनी बुधवारी अटक केली. आतापर्यंत सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आणखी कर्मचारी तक्रारी करीत असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मनुष्यबळ प्रमुख आणि व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल केला  आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा समावेश होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

हिंजवडी आयटी पार्कमधील टप्पा क्रमांक दोनमध्ये या कंपनीचे कार्यालय होते. कंपनीने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भरती केली. कंपनीने गेल्या वर्षभरात शेकडो अभियंत्यांना नोकरी दिली. त्यात प्रामुख्याने नवीन आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा समावेश होता. या उमेदवारांना सुरूवातीच्या काळात दरमहा १५ हजार रुपयांचे मानधनरुपी वेतन देण्यात आले. काही महिने कंपनीचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यापासून परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला तेव्हापासून विलंब सुरू झाला. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ या संघटनेकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर फोरमच्या पुढाकाराने या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. 

नेमका प्रकार काय?

कंपनीकडून दर महिन्याच्या ७ अथवा ८ तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होत असे. मात्र, वेतन उशिरा होण्यास सुरूवात झाली. नंतर महिना उलटूनही वेतन मिळत नसल्याचे प्रकार घड़ू लागले. यामुळे कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला याबद्दल जाब विचारला. कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेऊन कर्मचाऱ्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी कंपनीचे अंतर्गत लेखापरीक्षण सुरू आहे, असे कारण त्यांना देण्यात आले. याचबरोबर थकीत वेतन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कंपनीने अचानक एका रात्री कार्यालय बंद केले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने वेतनाचे धनादेश दिले होते. त्यांनी ते बँकेत जमा केले असता वटले नाहीत. आता या कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. हाती नोकरी नाही आणि वेतनही बंद झाल्याने हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कामगार विभागाकडून दखल

थिंकटेक इंडियातील प्रकाराची दखल कामगार आयुक्तालयाने घेतली आहे. या प्रकरणी तपासणीसाठी कामगार विभागाचे पथक गेले होते. परंतु, कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळले. या प्रकरणी कंपनीकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी अद्याप कामगार आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केलेली नाही. सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या आधारे कामगार आयुक्तालयाने पावले उचलली आहेत, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त एस.टी.शिर्के यांनी दिली.