पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहा प्रमुख रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी भूसंपादन, रस्त्याची आखणी आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रस्ते विकासासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
हिंजवडी, माण व मारुंजी भागातील रस्ते विकास, वाहतूक कोंडी, भूसंपादन आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहा प्रमुख रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी भूसंपादन, रस्त्याची आखणी आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी व जमीनमालकांना योग्य आणि जास्तीतजास्त लाभ मिळेल, याबाबत प्रशासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी व जमीनमालकांकडून सुमारे ६० ते ७० टक्के जमिनीची संमती तसेच आगाऊ ताबा उपलब्ध झाल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. त्यामुळे रस्ते विकासाच्या कामांना अनावश्यक विलंब होणार नाही. भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष रस्ते कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे
माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील शेतकरी व जमीनमालकांना भूसंपादन, हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) धोरण, दोन किलोमीटरच्या परिसरातील निवासी वापराचे नियम तसेच जमीन देणाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांची माहिती देण्यासाठी गावनिहाय मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे निर्देशही देण्यात आले.
अतिरिक्त रस्त्यांची पाहणी
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार सहा प्रमुख रस्त्यांव्यतिरिक्त आणखी दोन पर्यायी रस्त्यांची शक्यता तपासण्यात येणार आहे. विप्रो चौक, पुनवळे-मारुंजी जोडरस्ता तसेच कालव्यालगतच्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
कालव्यालगत किंवा सिंचन विभागाच्या ताब्यातील जमिनींचा रस्ते विकासासाठी वापर करण्यासंदर्भातील प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत तयार करून संबंधित कालवा मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आवश्यक परवानगी मिळवून पुढील कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना
भूमकर चौक, रावेतसह प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण, खड्डे बुजविणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हलक्या वाहनांसाठी आवश्यक रस्ते खुले करणे तसेच डांबरीकरणाची कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले.
