पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी ६ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय आयटीयन्स म्हणजेच आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी घेतला आहे. या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांना गुरुवारी पत्र देण्यात आले. या आंदोलनाची आयटीयन्सनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोर्चाचे नेतृत्व महिलांच्या हाती देण्यात आले असून, यात ज्येष्ठ नागरिकांसह जेन-झीचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे.
हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील आयटी कर्मचाऱ्यांसह रहिवाशांनी ६ सप्टेंबरच्या मूक मोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना पत्र दिले. मोर्चा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. तो आयटी पार्क टप्पा क्रमांक एकमधील इन्फोसिस सर्कलपासून सुरू होईल आणि डसॉल्ट सिस्टीम्स, शिवाजी महाराज चौकातून पुन्हा इन्फोसिस सर्कलला येईल. या मोर्चाचे नेतृत्व ५०० महिला कर्मचारी करणार आहेत. मोर्चात स्थानिक रहिवासी, आयटी कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असेल. या मोर्चावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना नागरिकांकडून मागणीपत्र सादर करण्यात येणार आहे.
शांततापूर्ण मोर्चा
हा मोर्चा शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने होईल. कायदा व सुव्यवस्था वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता याची पूर्ण काळजी घेण्यात येईल. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे सर्व पालन केले जाईल, अशी हमी मोर्चाच्या आयोजकांनी पोलिसांना दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्कमधील या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर म्हटले आहे, की जागतिक स्तरावर पुण्याची ओळख ‘आयटी हब’ म्हणून निर्माण करणाऱ्या हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसराची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, दररोजची प्रचंड वाहतूककोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक रहिवाशांना मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. राज्य शासनाकडून केवळ घोषणा करायच्या आणि बैठकांचे सोपस्कार पाडायचे, या पलीकडे प्रत्यक्ष काहीही काम झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मी नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
