पिंपरी : यात्रेत धिंगाणा घालणाऱ्याला गावच्या माजी पोलीस पाटलाने समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलीस पाटलालाच मारहाण केली. त्यामुळे मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या घरमालकाला सांगण्यासाठी पोलीस पाटील गेले असता एका तरुणाने त्यांना दमदाटी करून त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत तीन गोळ्या झाडल्या.

ही घटना रविवारी (१९ एप्रिल) रात्री साडेदहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथील भोईरवाडीमध्ये घडली. पोलिसांनी मयूर काळुराम भोईर याला अटक केली आहे. त्याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम नाथू भोईर (वय ५५, रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी याबाबत माहिती दिली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मुळशी तालुक्यातील माण गावची यात्रा असते. यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी रात्री नऊच्या सुमारास भोईरवाडी येथील दत्त मंदिरासमोर तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना एकजण स्टेजजवळ उभा राहून नाचून धिंगाणा घालत होता. त्यामुळे गावचे माजी पोलीस पाटील असलेले फिर्यादी तुकाराम त्याला समजावून सांगण्यासाठी गेले. त्या वेळी आरोपीने तुकाराम यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिथून निघून गेला.

तुकाराम यांनी आरोपीच्या घरमालकाला याबाबत सांगितले. घरमालकाने समजावून सांगण्याऐवजी तुकाराम यांच्याबरोबर भांडण केले. त्या वेळी मयूर याने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत तीन गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याने तुकाराम आणि त्याच्याबरोबर असलेले लोक घाबरून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.