पिंपरी : प्रेयसीने दुसऱ्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध जुळवल्याने पूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या प्रियकरावर लोखंडी गजाने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला, तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे गुरुवारी घडली.

या हल्ल्यात २१ वर्षांची तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे जखमी तरुणीबरोबर शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. तरुणी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. शिक्षणादरम्यान ती मारुंजी परिसरात ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहत होती. तेथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून आरोपी ते दोघे राहत असलेल्या इमारतीत आला. त्याने दोघांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार केले. हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.

नाकाबंदीदरम्यान आरोपी अटकेत

आरोपी मोटारीमधून पुणे-सोलापूरमार्गे पंढरपूरकडे पळून जात होता. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी संपर्क साधून आरोपीच्या वाहनाची माहिती दिली. उरुळीकांचन पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून आरोपीला पकडले. चौकशीत त्याने हिंजवडी येथे खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपीचा पाठलाग करत हिंजवडी पोलीसही उरुळीकांचनला पोहोचले. त्यानंतर आरोपीला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

जुन्या पैशांच्या व्यवहारातून जीवघेणा हल्ला; तिघांना अटक

जुन्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर फरशी, दगड आणि विटांच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिघी येथील विजयनगरमधील मोकळ्या मैदानात घडली.

प्रफुल्ल वसंत शिंदे (४३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात तन्मय प्रविण शिंदे (२२, विजयनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन उर्फ मोन्या संजय माने (२२, डोळस वस्ती, दिघी), युवराज मते (४०, गणेशनगर, बोपखेल) आणि जना रोहन माने (३३, दिघी गावठाण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचे काका प्रफूल शिंदे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गाठले. त्यांनी फरशी, दगड आणि विटांच्या साहाय्याने प्रफूल यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.